वैभववाडी (प्रतिनिधी) : तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या, तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, इ. नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्त्वाचा विकास हा नवीन शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज जाणून “आनंददायी शनिवार”/”दप्तर मुक्त शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत व ताणतणावरहित शिक्षणाची गोडी लागेल,मानसिक स्वास्थ्य जपले जाईल, उत्तम अध्ययन होईल.अशी उद्दिष्टे आहेत.
याच अनुषंगाने विद्यामंदिर कोकिसरे नारकरवाडी या प्रशालेत शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी “रस्ते सुरक्षा”हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत वैभववाडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे कृष्णांत पडवळ व रणजीत सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध वाहतूक चिन्हे दाखवून त्यांचा अर्थ समजावून सांगितला. रस्त्यावरून चालताना किंवा पालक गाडी चालवतात तेव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे हे उदाहरणासहित स्पष्ट केले. तसेच अपघात समयी कोणत्या कृती केल्या पाहिजेत हे सांगून 108 व 112 क्रमांक डायल करण्याचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन ही केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका संपदा बागी- देशमुख मॅडम यांनी केले तर आभार संजय कावळे यांनी मांडले. यावेळी समीर सरवणकर व पालक उपस्थित होते.











