भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या डीन आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचना
सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अनेक गैरसोयी असून त्या गैरसोळी दूर कराव्यात यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जोशी यांची भेट घेत या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर चांगले उपचार चांगली रुग्ण सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
जिल्हा रुग्णालयातील दोन्ही लिफ्ट बंद असल्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर अस्थिव्यंग उपचाराची मशीन गेले काही महिने बंद असल्यामुळे रुग्णांना कणकवली गाठावी लागते यासाठी निधीची तरतूद केलेली आहे,वैद्यकीय साहित्य पुरवठा करणाऱ्या प्राधिकरण कडे याबाबत पाठपुरावा करून सदरची मशीन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी सांगितले.डायलिसिस मशीन अधिक संख्येने उपलब्ध करून देण्यासंबंधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मा खासदार नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून तातडीने प्रयत्न केले जातील ग्वाही प्रभाकर सावंत यांनी यावेळी दिली. शवागरातील मशीन दुरुस्ती संदर्भात सूचना केल्या.तसेच कंत्राटी भरती पारदर्शक होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न झाले पाहिजेत अशी ताकीद त्यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे आता सर्व अधिकार आले असून जिल्हा रुग्णालयाचे अधिकार कमी झाले आहेत मात्र त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होऊ नये याची दक्षता घ्यावी असाही सूचना यावेळी देण्यात आल्या. गेले काही दिवस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेवर परिणाम झाला होता. याबाबत अनेक रुग्णांच्या तक्रारी होत्या. येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई वालावकर यांनी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींचे लक्ष वेधले होते. या याबाबत भाजप पक्षाने ही गंभीर दखल घेत तातडीने भेट घेतली. येथील प्रश्नाबाबत चर्चा केली. जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, अनिलकुमार देसाई सुप्रिया ताई वालावलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.