खरारे – पेंडूर सरपंच, ग्रामसेवक करतायत कर्तव्यात कसूर ; स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी ठेकेदार वेठीस
चौके (प्रतिनिधी) : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या गावातील म्हणजेच मालवण तालुक्यातील खरारे – पेंडूर गावच्या ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभाराचा एक प्रकार समोर आला आहे. तो म्हणजे गावातील दोन नळयोजनांची कामे पूर्ण करून ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडे २०१४ / १५ साली हस्तांतरित केली असून सदर कामांची अंदाजे आठ लाख एवढी रक्कम ग्रामपंचायतीकडून ठेकेदार उमेश शंकर चव्हाण आणि पोट ठेकेदार गणेश लवू परब यांना देणे आहे. प्रत्यक्षात सदर रक्कम 29/07/2020 ला ग्रामपंचायतीकडे जि. प. कडून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वर्ग करण्यात आली आहे. तरीही खरारे – पेंडूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक कर्तव्यात कसूर करत असून ठेकेदारांना बिलाची रक्कम अदा करण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची मालवण बिडीओंकडे सुनावणी होऊन त्यांनी संबंधित ठेकेदारांना ७ दिवसांच्या आत बिलाची रक्कम अदा करण्याचा आदेश सरपंच आणि ग्रामसेवक यांना देउनही सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी कारभार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश धाब्यावर बसवत आहेत. याबाबत खरारे पेंडूर ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक स्वतः केलेले भ्रष्टाचार लपवण्यासाठी आम्हा ठेकेदारांना वेठीस धरत आहेत असा आरोप पोट मक्तेदार गणेश परब यांनी केला आहे आणि ग्रामपंचायत कारभाराची आणि पाणी व स्वच्छता समितीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही केली आहे.
या प्रकाराबद्दल सविस्तर वृत्त असे कि , खरारे मधलीवाडी, टेंबवाडी , पुनासीवाडी विहीर व नळपाणी योजना तयार करणे हे २० लाख ८७ हजार ७१७ एवढी निवीदा रक्कम असलेले काम २५/०६/२००९ रोजी ठेकेदार उमेश शंकर चव्हाण आणि पोट ठेकेदार श्री गणेश लवू परब यांनी घेऊन ते ३१ / ०३/ २०१३ रोजी पूर्ण केले. आणि ३१/ ०५/ २०१४ रोजी सदर काम पूर्ण स्थितीत ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले. या कामाच्या एकूण बिलापैकी ५ लाख १७ हजार ७१७ एवढी रक्कम अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीकडून ठेकेदारांना येणे आहे. सदर रक्कम दोन वर्षांपूर्वीच म्हणजेच 29/07/2020 रोजी जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून खरारे पेंडूर ग्रामपंचायतीकडे जमा करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पेंडूर खरारे मोगरणेवाडी येथे नळपाणी योजना तयार करणे. हे दुसरे कामही पूर्ण करून २०/०१/२०१५ रोजी ठेकेदार गणेश परब यांनी पूर्ण करून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केले आहे. या कामाच्या एकूण बिलापैकी सुमारे १ लाख ७५ हजार एवढी रक्कम ग्रामपंचायत ठेकेदारांना देणे आहे.सदर दोन्ही कामांची अंदाजे साडेसात ते आठ लाख एवढी बिलाची रक्कम ग्रामपंचायत ठेकेदारांना देणे आहे.
सदर रक्कम दोन वर्षापुर्वी ग्रामपंचायत दफ्तरी जमा होऊनही सरपंच आणि ग्रामसेवक मक्तेदारांना बिलाचा शेवटचा हफ्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत.याविषयी ठेकेदार उमेश चव्हाण आणि गणेश परब यांनी २१/०९/२०२२ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देउन दाद मागितली त्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सदर बिलाची रक्कम ७ दिवसांच्या आत ठेकेदारांना देण्याचे आदेश खरारे – पेंडूर सरपंच आणि ग्रामसेवक यांना विशेष बैठक घेऊन दिले. त्यानंतर याविषयी दोन वेळा ग्रामसभेमध्ये ठरावही मांडण्यात आला आणि ठेकेदारांना बिलाची रक्कम अदा करण्यास सांगण्यात आले. याला चार महिने होत आले तरी पेंडूर सरपंच , ग्रामसेवक यांच्याकडून ठेकेदार गणेश परब यांना बिलाचे पैसे देण्यास टाळाटाळ होत आहे.
ग्रामपंचायत खरारे पेंडूर च्या सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराबद्दल ठेकेदार गणेश लवू परब यांनी नाराजी व्यक्त केली असून मक्तेदारांच्या बिलांची गेली दोन वर्षे ग्रामनिधीत पडून असलेली रक्कम ग्रामपंचायत इतर कामांसाठी वापरत असून वारंवार पत्रव्यवहार करूनही आमचे पैसे आम्हाला का दिले जात नाहीत ? याचा अर्थ खरारे पेंडूर ग्रामपंचायतीत लाखो रुपयांची अफरातफर झाली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक आम्हाला वेठीस धरत आहेत असा थेट आरोपही गणेश परब यांनी केला आहे. तसेच सरपंच व ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराची मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि ग्रामपंचायत विभाग आणि गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन संपूर्ण कारभाराची चौकशी करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पेंडूर नळयोजनेच्या कामाचे पोटमक्तेदार गणेश परब यांनी केली आहे.