चौके (अमोल गोसावी) : चौके येतील भ. ता चव्हाण, म. मा. महाविद्यालय चौके याप्रशालेमार्फत गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही चौके ग्रामदेवता श्रीदेवी भराडी मंदिर परिसरात शालेय मुले आणि पालक व शिक्षक असा संयुक्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवारी सकाळी पार पडला. यावेळी स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री. बिजेंद्र गावडे यांच्या संकल्पनेतून व शालेय सहभागातून यावेळी औषधी व उपयोगी विविध प्रकारची सुमारे 60 झाडे मंदिर परिसरात लावण्यात आली.
गतवर्षी ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत सुमारे 75 झाडे लावण्यात आली होती. वर्षभर या झाडांचे शालेय मुलांकडून संगोपन करण्यात आले. यावर्षीही लावण्यात आलेल्या प्रत्येक नवीन झाडांचें संगोपन करण्याची जबाबदारी लावणाऱ्या मुलांकडे देण्यात आली आहे.यावेळी स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष श्री बिजेंद्र गावडे, उपाध्यक्ष अनिल सुकळी, मुख्याध्यापक सौ. रसिका गोसावी मॅडम यांच्यासह शिक्षक माता पालक,शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. चौके हायस्कूलच्या वतीने राबविण्यात आलेल्या आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.











