वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले नऊ दहा दिवस बंद असलेली तरेळे भुईबावडा गगनबावडा कोल्हापूर या महामार्गवरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून सुरु झाली आहे. मात्र प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे काही ठराविक एस टी बस या मार्गे गेल्या तर काही बस फोंडा मार्गे गेल्या. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. गगनबावडा कोल्हापूर दरम्यान पुराचे पाणी, तसेच बलिंगा पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे ही वाहतूक बंद होती.
गेल्या आठवड्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे जिल्ह्यातील नदीना पूर आला होता. पुराचे पाणी गगनबावडा कोल्हापूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक 21 जुलै पासून बंद झाली होती. गेले दोन तीन दिवस पावसाचा जोर ओसरल्यामुळे रस्त्यावरील पाणी सोमवारी खाली गेले होते. तर बलिंगा पुलावरील पाणीही खाली गेले होते. मात्र या महापुराने बलिंगा पुलाला कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही ना. याबाबत राष्ट्रवाय महामार्ग प्राधिकरण खात्री करत नाही. तोपर्यंत त्यांच्याकडून वाहतूकीला परवानगी देण्यात आली नव्हती. अखेर मंगळवारी सकाळपासून पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना, वाहचालक, व्यापारी यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्यातील वाहतूक आता तरेळे वैभववाडी भुईबावडा घाटातून गगनबावडा ते कोल्हापूर अशी सुरु झाली आहे.
एकीकडे करूळ घाट बंद असल्यामुळे तालुक्यातील प्रवाशांना कोल्हापूरला जाण्यासाठी भुईबावडा घाटाचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र गगनबावडा कोल्हापूर दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यामुळे ही वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशी, व्यापारी वाहनचालक यांनी मोठी अडचण झाली होती.वाहतूक सुरु झाल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.