वीज ग्राहकांचे लाखोंचे नुकसान
कणकवली (प्रतिनिधी) : महावितरणची पोल वरील न्युट्रल तार तुटून वीज पुरवठा अचानक दुप्पटीने वाढल्याने टेंबवाडीतील अनेक वीज ग्राहकांची चालू असलेली हजारो रूपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. हा प्रकार शुक्रवारी पहाटे ५ ते ८ वाजण्याच्या दरम्यान घडला.
दरम्यान टेंबवाडीतील ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी सकाळी ७ .३० वाजण्याच्या दरम्यान महावितरणच्या शहर विभागाच्या कार्यालयातील अधिकार्याशी संपर्क साधून घरातील विद्युत उपकरणे बंद पडली असल्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी तातडीने वीज कर्मचार्यांना पाठवून नेमकी काय वस्तुस्थिती आहे याची माहिती करुन घेतली. त्यावेळी टेंबवाडीकडे जाणार्या रस्त्यावरील एका पोलावरील न्युट्रल तार तुटून पडली होती. या संदर्भात पुन्हा संबंधित अधिकार्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा वेळी वीजेचा २३० वॅटचा वीज पुरवठा अचानकपणे दुप्पटीने वाढला जातो. त्याच दरम्यान चालू असलेली विद्युत उपकरणे जळून नादुरुस्त होतात, अशी माहिती दिली. त्यावेळी महावितरणच्या दुर्लक्षित कारभारामुळे वीज ग्राहकांचे नुकसान होत असेल तर त्याला महावितरण जबाबदार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यावेळी संबधित अधिकार्यांने ही महावितरणची चूक असल्याचे मान्य करुन पंचनाम्यासाठी आमच्या कर्मचार्यांना पाठवून देत आहोत असे सांगितले. त्याप्रमाणे महावितरणच्या कर्मचार्यांनी टेंबवाडीतील तक्रार दाखल केलेल्या ग्राहकांच्या निवासस्थानी जाऊन बंद पडलेल्या विद्युत उपकरणांची तपशीलवार माहिती नोंद वहीत नोंदवून संबधित ग्राहकांच्या सह्या घेतल्या आहेत.
दरम्यान संबधित अधिकार्याने नुकसान झालेल्या वीज ग्राहकांनी महसूल विभागामार्फत तलाठी यांच्याकडून पंचनामे करून घ्यावेत, असे सांगितले. मात्र महावितरणच्या दोषपूर्ण कारभारामुळे वीज ग्राहकांचे नुकसान झाले असेल तर महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचा संबंध काय असा प्रश्न वीज ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच शनिवार, रविवार हे दोन दिवस शासकीय कर्मचार्यांचे सुटीचे दिवस असल्याने जळलेल्या उपकरणांच्या पंचनाम्यासाठी किती दिवस ती उपकरणे दुरुस्तीविना जाग्यावर ठेवायची, विशेषतः विहिरीतील पाणी पंप हा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
अचानकपणे वाढलेल्या वीज प्रवाहामुळे चव्हाण यांच्या विहिरीतील पाण्याच्या पंपाचे वायडिंग जळून गेले आहे. त्यामुळे त्यांना तो पंप रिवायडिंग करण्यासाठी इलेक्ट्रिकल दुरुस्ती करण्यासाठी द्यावा लागला आहे. तर चव्हाण यांच्या घरातील ३ पंख्यांचे वायडिंग जळले आहे. तर एका पंख्याचा रेग्युलेटर जळला आहे. टेंबवाडीतील आम्रपाली सोसायटीतील रहिवाश्यांपैकी काही जणांचे दूरदर्शन संचासह अन्य उपकरणे जळली आहेत. तसेच टेंबवाडीतील अन्य काही घरांतील पाण्याच्या पंपांसह अन्य उपकरणे जळाली आहेत. आम्रपालीतील महिलांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन शुक्रवारी संबधित अधिकार्यांना जाब विचारला. त्यावेळी या सोसायटीत कर्मचार्यांना पाठवून झालेल्या नुकसानीची माहिती नोंद वहित घेऊन त्याखाली संबंधित ग्राहकांच्या सह्या घेतल्या आहेत. मात्र याबाबतची माहिती काही ग्राहकांना न समजल्यामुळे त्यांच्या नुकसानीची नोंदच झालेली नाही. तरी संबधितांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या झालेल्या नुकसानीची नोंद करुन घेतली पाहिजे. विशेषतः पाण्याचे पंप जळाल्याने भर पावसात ते बंद पडल्याने संबधितांचे पाण्याविना हाल होत आहेत. त्यातच कणकवली नगरपंचायतीचे काही भागातील पाण्याचे पंपही जळाल्याने घरगुती पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे संबधितांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
दरम्यान तीन महिन्यांपूर्वी याच पोलवरील अल्युमिनियमची तार संतोष सलून आणि राऊळ सायडिंग वर्क्स याच्या दुकानांच्या समोर अचानक तुटून पडली होती. त्यावेळी दुकानाच्या बाहेर पडत असलेले राऊळ बाल बाल बचावले होते. त्यावेळी या दोघांनी महावितरणच्या कार्यालयात पोल वरील तार्यांच्या बेफिकरी अवस्थेबाबत तातडीने बंदोबस्त करावा, असे सांगितले होते.