संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय ; पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून ही अनियमितता कागदोपत्री न करता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबधिताने सुमारे ४१ लाखांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. संशयिताकडून ४५ लाख वसूल करण्यात आले आहे. संस्थेच्या सीए मार्फत ऑडिट सुरू असून त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वेंगुर्ला पतपेढीत झालेल्या अनियमितेत संबंधिताने काढलेली रक्कम अन्य सभासदांच्या खात्यात टाकली आहे का? टाकली असेल तर का टाकली याबाबत चौकशी सुरू असून पूर्ण चौकशी नंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र सध्य स्थितीत एकाही सभासदाची तक्रार नाही. तरीही काही सभा सदाकडून संस्थेला नाहक बदनाम करण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल एकालाही पाठीशी घातले जाणार नाही असे यावेळी सांगण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक हे येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संतोष राणे, संचालक संजय पवार, चंद्रसेन पाताडे, विद्याधर तांबे, सचिन बेर्डे, विजय सावंत, श्रीकृष्ण कांबळी, मंगेश कांबळी, ऋतुजा जंगले, सिताराम लांबर आदी उपस्थित होते.
यावेळी नारायण नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची जीवनदायींनी असलेली आणि त्यांना आर्थिक स्थैर्य निर्माण करून देणारी सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक सहकारी पतपेढी आहे या पतसंस्थेच्या शाखा सिद्धी उपक्रमांतर्गत सर्व शाखांची तपासणी केली जाते. या तपासणीत पतसंस्थेच्या वेंगुर्ला शाखेत आर्थिक अनियमितता झाली असल्याचे दिसून आले. तेथील शाखाधिकार्यांनी काही सभासदांच्या कर्ज व ठेव खात्याच्या रकमा संगणक प्रणाली मधून आपल्या अन्य काही सभासदांच्या खात्यावर वळविल्याचे चौकशीत दिसून आले. त्यामुळे त्या शाखेची पुन्हा एकदा सखोल चौकशी केली असता आर्थिक नियमितता झाल्याचे दिसून आले तसेच आर्थिक अनियमिततेचा आकडा वाढत असल्याने संबंधित शाखाधिकारी यांच्या कालावधीतील सर्व रेकॉर्ड व डेटा पंच यादी करून प्रधान कार्यालयात आणण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची सीए मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत शाखा अधिकारी दोशी आढळून येत आहे मात्र सीए यांच्या अंतिम अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र या दोषी आढळणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर कडक व कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
४५ लाख भरून घेतले
वेंगुर्ला शाखेत झालेल्या प्रकरणी प्राथमिक चौकशीत सुमारे ४१ लाखांची अनियमितता आढळून येत आहे. मात्र संबंधित व्यक्तीने बॉण्ड करून अनियमितता केल्याचे मान्य केले आहे. तसेच सहकार नियमानुसार त्याच्याकडून अपहारित रकमेच्या ११० टक्के रक्कम ४५ लाख रुपये वसूल करण्यात आली आहे. तसेच त्याने अपहार वाढल्यास तीही रक्कम भरणार असल्याचे संबंधिताने स्पष्ट केले आहे. असे यावेळी अध्यक्ष नाईक यांनी सांगितले तसेच पतसंस्थेच्या कोणत्याही सदस्याची रक्कम अपारीत झाली असेल अशा सदस्याला त्याची रक्कम व्याजासहित वसूल करून दिली जाईल त्यामुळे कोणत्याही पतसंस्थेच्या सदस्याने अफवांवर विश्वास ठेवू नये चौकशी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी नारायण नाईक यांनी केले आहे
कागदोपत्री नाही पण सॉफ्टवेअर माध्यमातून अनियमितता
वेंगुर्ला शाखेच्या अनियमितता बाबत बोलताना अध्यक्ष म्हणाले की संबंधित व्यक्तीने कागदोपत्री कोणताही अपहार केलेला दिसून येत नाही मात्र चौकशी अंती संस्थेच्या सॉफ्टवेअर मधून अनियमितता केल्याचे दिसून आले असल्याचे सांगितले.