कणकवली महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी प्राध्यापकांचा मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेच्या वतीने वरिष्ठ महाविद्यालयातील कार्यरत सर्व प्राध्यापकांचा मेळावा सोमवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली महाविद्यालयातील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. वरिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग व राज्य शासन यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास येथील नोकरशाही सातत्याने टाळाटाळ करताना दिसते. शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण हे अत्यंत धोक्याचे धोरण असून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनाही नियमित वेतन मिळत नाही. तसेच मुंबई विद्यापीठ व कोकण विभाग शिक्षण सहसंचालक यांच्याकडे प्राध्यापकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.


या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा व विचार मंथन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मुंबई विद्यापीठ व प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. जी. बी. राजे, तसेच मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. सोमनाथ कदम, मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे (बुक्टु) कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. डॉ. नानासाहेब कांबळे व उपाध्यक्ष प्रा. विनोदसिंह पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयातील कंत्राटी, मानधन व तासिका तत्त्वावर कार्यरत प्राध्यापक व कायमस्वरूपी अशा सर्व प्राध्यापकांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई विद्यापीठ व महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना कणकवली शाखेचे अध्यक्ष प्रा डॉ. श्यामराव दिसले व प्रा.सचिन दर्पे, प्रा.प्रियांका लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!