स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूं पोहचू शकत नसतील तर स्पर्धा कोणासाठी ? क्रीडा शिक्षकांमधून संतप्त सवाल
तळेरे (प्रतिनीधी) : एसटीचा संप सध्या राज्यभर सुरू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच एसटी डेपो मधून कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतल्यामुळे ग्रामीण भागातील सर्व बंद गाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची मोठी परवड सुरू आहे. ग्रामीण भागातून शाळेपर्यंत विद्यार्थी येताना मोठी कसरत करावी लागत आहे. एसटी विना शाळेतील संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. असे असताना जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू ठेवणे खेळाडूंचे नुकसानकारक ठरू शकतात.ही बाब जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय निदर्शनास आणून दिले तरीही नियोजित वेळापत्रकानुसार स्पर्धा पार पाडण्याची घाट जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सुरू आहे. अद्यापही कोल्हापूर विभागीय वेळापत्रक जाहीर झाले नाही. आपत्कालीन परिस्थितीतीचा विचार करुन वेळापत्रकात बदल केला तरी कोल्हापूर विभागीय स्पर्धेत कोणत्याही परिणाम होणार नाही व खेळाडूंचे नुकसानही होणार नाही .कालपासुन एस.टी बंद असल्याने स्पर्धेच्या ठिकाणी जर खेळाडू पोहचू शकत नसतील तर ही स्पर्धा कोणासाठी घेताय? आणि स्पर्धेत कोण खेळणार असा संतप्त सवाल शाळांचे मुख्याध्यापक ,क्रीडा शिक्षक,कोच व पालकांमधून केला जात आहे. संपामुळे खेळाडू नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सदर स्पर्धांची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बयाजी बुराण,सचिव दिनेश म्हाडगूत यांनी केली आहे.