‘कर्मचाऱ्यांची जबाबदारी व बांधिलकी’ यावर व्याख्यान
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली – उपक्रमशील, निपक्षपाती, कर्तव्यदक्ष व नेतृत्व क्षमता असलेला कर्मचारी अधून मधून स्वतःचे मूल्यमापन करतो. ‘चुका आणि शिका’ हेच कोणत्याही क्षेत्रात निष्ठेने काम करण्याचे सूत्र असते. आपल्याला कडे असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्यास कार्यभार न मानता आनंददायी कार्य करण्याची संधी मानले तर कोणतेही कार्य अधिक गतिमान होते असे मत कणकवली महाविद्यालय कणकवली येथील इतिहास विभाग प्रमुख तथा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी व्यक्त केले. येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात स्टाफ अकादमीच्या वतीने ‘कर्मचारी वर्गाची कार्यपद्धती आणि बांधिलकी’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मुंबरकर होते तर मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक प्रा.महादेव माने , कार्यालय अधीक्षक संजय ठाकूर उपस्थित होते. ‘आत्मविश्वास हेच कर्मचाऱ्यांच्या कर्तुत्व वृक्षाचे मूळ असते. सकारात्मक कार्य पद्धतीने आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेवली तर एक व्यक्ती म्हणून नव्हे तर साधन व्यक्ती म्हणून आपले महत्त्व वाढते’ असे सांगून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात किरकोळ चूक सुद्धा आपले करिअर धोक्यात आणू शकते याची जाणीव डॉ. सोमनाथ कदम यांनी यावेळी करून दिली. पुढे बोलताना प्रा.कदम म्हणाले की, “आपल्या आस्थापनेवर प्रामाणिक निष्ठा बाळगून नेहमी उत्साही व सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आपल्या अधिकार व कर्तव्याची विषयी दक्ष असणारा कर्मचारीच सन्मान पात्र होतो. कसलाही अहंकार न ठेवता आपल्या ज्ञान आणि कौशल्यात वाढ करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करायला हवेत. कर्मचारी वर्गाच्या दृष्टिकोनावरूनच संबंधित आस्थापनेची समाजात ओळख निर्माण होत असते. उच्चारावरून विद्वत्ता, आचारावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते याची जाणीव सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना असायला हवी”.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शिस्त पालन, सामूहिक जबाबदारी, व कार्य पद्धती बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत अमृते यांनी केले व उपस्थितांचे आभार कनिष्ठ लिपिक मंगेश आरेकर यांनी मानले. यावेळी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.