मालवण (प्रतिनिधी) : राजकोट किल्ला येथील पुतळा दुर्घटनेतील मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे व तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज येथील न्यायालयात हजर केले असता १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पुतळ्याचा ठेकेदार जयदीप आपटे, तांत्रिक सल्लागार डॉ. चेतन पाटील या दोघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तांत्रिक सल्लागार डॉ. पाटील याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर जयदीप आपटे हा प्रसार होता. त्याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आउट नोटीसही जारी केली होती. यात काल रात्री मुख्य संशयित आरोपी जयदीप आपटे याला कल्याण येथून त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. आज सकाळी त्याला मालवण पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. दुपारी या दोन्ही संशयित आरोपींना येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष व संशयित आरोपींच्या वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी या दोन्ही संशयित आरोपींना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.