न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, फोंडाघाटची “रंगीत संगीत दिंडी” अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी प्रेक्षणीय व लक्षवेधी !

“संत गोरोबा कथेवर आधारित चित्ररथ सर्वांचेच आकर्षण ! श्रद्धा- भक्तीचा संगम भाविकांना भावला. त्यातील भूमिकांचे सर्वांकडून कौतुक !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे येथील राधाकृष्ण मंदिरातील सहाव्या दिवशी पूर्वसंध्येवर आणि धुवांधार पर्जन्यवृष्टी असून सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आणि ज्युनिअर कॉलेजची रंगीत संगीत दिंडी आणि चित्ररथाला भाविकांनी ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद देत कलाकार, संयोजक, शिक्षक, सहकारी स्टाफ आणि आपल्या पाल्यांचे कौतुक केले. मंदिर व्यवस्थापकांनी सुद्धा प्रशालेच्या उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.

दिवसभर संततधारेनंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतली, आणि दिंडी एस.टी. स्टँड कडून बाजारपेठेतून मार्गस्थ झाली.पुढे ढोल- ताशांचा गजर अन् बुलंद जयकार वातावरण निर्मिती करीत होता. त्यामागे लेझीम पथकातील आणि विविध वेशातील मुला- मुलींचे लेझीम प्रकार लक्ष वेधून घेत होते. त्यातील ध्वजधारक मुलांचा वावर लक्षवेधी होता. त्यामागे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महिला वर्गाच्या पारंपारिक सणावर आधारित गाण्यावर ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी अप्रतिम नृत्याविष्कार सादर करीत होत्या. त्यामध्ये झिम्मा, फुगड्या आणि नृत्याचा अपूर्व संगम दिसून येत होता.त्यानंतर वारकरी संप्रदाय वेशातील मुला- मुलींनी टाळ- मृदुंग- चिपळ्यांच्या तालावर वारकरी मुलामुलींनी भजन आणि त्यातील बारकावे दाखवणारे भक्तिमय प्रकार दाखविले. पार्श्वगायन करणाऱ्या रुत्वी सावंत या मुलीने प्रसंगावधान राखताना साजेशी गाणी सादर केली.

सर्वात पर्वणी ठरला तो संत गोरोबा कुंभारांच्या भक्तीवर आधारित चित्ररथ ! गोरोबा आपल्या नामसंकीर्तनाच्या नादात, आपल्याच मुलाला भांडी तयार करण्याच्या माती तुडवून ठार मारतात. गोरोबांची पत्नी पुत्रवियोगांने हंबर्डा फोडून विठ्ठलाला शिव्या देते. गोरोबा ची आर्त हाक श्रद्धा- भक्ती मुळे विठ्ठल परमात्मा दर्शन देऊन मुलाला जीवदान देतात. अशा कथानकावर आधारित हा देखावा प्रेक्षक,भाविक आणि ग्रामस्थांना अंतर्मुख करून गेला.या चित्ररथा साठी दुर्वांक नातू ,हर्षिका बोबकर, ओमकार लाड, अमित लाड यांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या. तर संकल्पना आणि सहकार्य लकुल गोसावी, दत्तगुरु चव्हाण, संदीप नानचे, वृषाली पवार, राणे मॅडम, पर्यवेक्षक प्रसाद पारकर, मुख्याध्यापक रासम यांची होती. सजावट मिस्त्री बंधू, संगीत सुजित सामंत,प्रकाश योजना वीरेश रेवडेकर यांनी केली.

पावसाच्या ब्रेक मध्ये दिंडी पुढे पुढे सरकत होती. शिक्षक वर्ग, संचालक, विद्यार्थी- विद्यार्थिनींचा उत्साह यत्किंचितही कमी होत नव्हता. भाविक, ग्रामस्थ, आणि पालक, यांनी आपल्या पाल्याच्या अदाकारीची झलक पाहण्यासाठी एकच तुडुंब गर्दी केल्याने, फोंडाघाट बाजारपेठ ओसंडली होती. यावेळी ट्राफिक सोडविण्यासाठी संजय नेरूरकर, गणेश गोसावी, त्यांचें सहकारी, दक्ष ग्रामस्थ तसेच पोलीस कॉन्स्टेबल तांबे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. रंजन नेरूरकर, सचिन तायशेटे, इत्यादी संचालक, तसेच मुख्याध्यापक रासम,सहकारी शिक्षक, कर्मचारी स्वतः जातीने लक्ष ठेवून होते. अनेक नैसर्गिक आपत्ती तसेच ट्राफिक समस्येवर मात करीत, न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजची रंगीत संगीत दिंडी आणि चित्ररथ प्रेक्षणीय आणि लक्षणीय पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!