ब्लडबॅग चे वाढीव सेवा शुल्क आकारु नये

सिंधुरक्तमित्र शाखा देवगड च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-देवगड यांचे वतीने तहसिलदार देवगड यांना राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापन रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात आलेल्या सुधारीत सेवाशुल्क वाढीबाबत निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा-देवगडचे पंढरीनाथ आचरेकर, रविकांत चांदोस्कर, उध्दव गोरे,विजयकुमार जोशी,प्रविण जोग,प्रकाश जाधव, बाप्पा रुमडे,रेश्मा जोशी,अनुप बापट, राजेंद्र पाटील, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
या निवेदनामध्ये असे नमुद केले आहे की, शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमीट असणा-या व रक्ताची गरज लागणा-या सर्व रुग्णांना आता रक्त पूर्णपणे मोफत् दिले जाणार आहे. हे निश्चितपणे स्वागतार्थ आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांना हा निश्चितच मोठा दिलासा मिळेल. मात्र याचवेळी दुसरा निर्णय असा घेतला आहे की , खाजगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांसाठी मात्र रुपये 450 वरुन रुपये 1100 इतकी दरवाढ केली आहे. तथापि आपण आपल्या निदर्शनास असे आणू ईच्छितो की, अनेकवेळा काही सेवा या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत, अशावेळी खाजगी रुग्णालयात नाईलाजाने रुग्णांवर उपचार केले जातात. अशावेळी जर रक्ताची गरज लागली तर या सुधारीत दराने सामान्य व गरीब रुग्णास रक्त घ्यावे लागेल परंतु निश्चितच खाजगी रुग्णालयात जाणा-या सामान्य व गरिब रुग्णांना ही दरवाढ परवडणारी नाहीय, त्यामुळे ही नवीन दरवाढ रद्द करुन जुन्या धोरणा प्रमाणेच ती 450 रुपये अशी ठेवण्यात यावी. खेडयापाडयातील सामान्य व गरीब जनता नाईलाजाने किंवा अपरिहार्यपणे खाजगीत उपचार घेत आहेत, रक्ताचे शुल्क वाढवल्यामुळे हा अधिकच भुर्दंड या जनतेस पडणार आहे. या बाबीकडे अत्यंत संवेदनशीलतेने शासनाचा लक्षवेध करुन तसेच सुधारीत वाढीव सेवाशुल्काबाबत स्थगिती देऊन ती पुर्वत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा असे या निवेदनामध्ये नमुद केले आहे.

error: Content is protected !!