वैभववाडी (प्रतिनिधी) : शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घ्यावे. या मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वैभववाडी शहरातून रॅली काढत तसीलदार वैभववाडी यांना निवेदन देण्यात आले. वैभववाडी येथील दत्तमंदिर ते तहसीलदार कार्यालय दरम्यान उमेद संघटनेच्यावतीने समुदाय संसाधन महिलांनी रॅली काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांनी वेळोवेळी दिलेले आश्वसन अद्याप पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे अभियानातील सर्व महिला केडर, कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे दिनांक 25 सप्टेंबर पासून संप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून वैभववाडी शहरातून प्रभात फेरी काढली. यावेळी तालुकाध्यक्ष सुप्रिया मोहिते, उपाध्यक्ष साक्षी भूतार्णे,सचिव दिपाली मोपेरकर, कोषाध्यक्ष नंदिनी गुरव, सुप्रिया साळुंखे, विदया महाडिक यांच्यासह उमेद संघटनेच्या संसाधन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.