वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात पडत असलेल्या परतीच्या पावसाने भात शेती आडवी होऊन भात शेतीचे मोठे नुकसान होतं आहे. हातातोंडांशी आलेले पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त होत. तर कापणीला विलंब होत असल्यामुळे रान डुक्कर तसेच गवा रेडा यांच्याकडून शेतीचे नुकसान केले जात आहे. नैसर्गिक आपत्ती बरोबर जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
ऑक्टोबर महीना संपत आला तरी अजून जोरदार पाऊस कोसळत आहे. या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका हा भात पिकाला बसत आहे. सध्या भात पीक कापणीला आले आहे. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे भात कापणीत मोठा व्यत्यय येत आहे. जोरदार पावसामुळे उभी भात शेती आडवी झाली आहे. त्यामुळे शेती भात शेती कुजून त्याची मोठया प्रमाणात नासधूस होत आहे. अडव्या भात शेतीला परत कोंब फुटत आहेत. त्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्न सुद्धा निर्माण होणार आहे. आपल्या डोळ्यादेखत उभे पीक जमीनदोस्त होताना पाहून शेतकऱ्यांचे काळीज तुटत आहे. मात्र या अस्मानी संकटापुढे काहीही करता येत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
पावसामुळे कापणी लांबणीवर पडत आहे. त्यातच सहयाद्रीच्या पाट्यातील गावात रान डुक्कर व गवा रेडा यांचा उपद्रव वाढला आहे. त्यांच्याकडून भात शेती फस्ट केली जात असून मोठया प्रमाणात नासधूस केली जात आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे भात शेतीची पावसाकडून होणारे नुकसान तसेच जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान याचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.










