राष्ट्रीय संत जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील तेली समाज बांधव आणि ग्रामपंचायत खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने शासन परीपत्रकानुसर तेली समाजाचे आराध्य दैवत तथा राष्ट्रीय संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या ४०० व्या जयंतीचे आयोजन दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी श्री देव कपिलेश्वर मंदिर खारेपाटण येथे करण्यात येणार असल्याची माहिती तेली समाज मंडळ खारेपाटण चे कार्यकर्ते रमेश जामसंडेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यानिमित्ताने खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते सकाळी १०.०० वाजता संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. यानंतर सकाळी १०.३० महाआरती व कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११.३० वाजता प्राथमिक शिक्षिका अर्चना तळगावकर व सुप्रिया झगडे यांचे “संत जगनाडे महाराजांचा इतिहास व त्यांचे कार्य ” या विषयवार प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहे. तसेच दु. १.०० ते २.०० प्रसाद वाटप व त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न होणार आहे. याबरोबरच कार्यक्रमाच्या निमित्ताने वारकरी भजन आणि आरतीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी खारेपाटण पंचक्रोशीतील तेली समाज ज्ञाती बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तेली समाज बांधव खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.












