तब्बल 10 तास वाहतूक ठप्प : सकाळच्या दोन एस. टी. फेऱ्या रद्द
स्थानिक तरुणांनी मदतकार्य करून रस्ता वाहतुकीस केला मोकळा
चौके (प्रतिनिधी) : काळसे – पेंडूर कट्टा मार्गावर काळसे नमसवाडी येथे मुख्य रस्त्यावर शुक्रवार दि. 6 डिसेंबर रोजी रात्रौ 11 वाजता बिबा जातीचे जीर्ण झालेले भालेमोठे झाड मुख्य रस्त्यावर तुटून पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री 11 वाजल्यापासुन दि. 7 डिसेंबर रोजी शनिवार सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे सुमारे 10 तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान सकाळी स्थानिक रहिवासी पोलीस पाटील विनायक प्रभू, सचिन सावंत, प्रशांत चव्हाण, यश परब, सुनिल वरक, दिनेश नांदोस्कर, सतीश सरमळकर, संदीप शिंग्रे, अण्णा गुराम, प्रीतम चव्हाण, तुषार रामाडे, वायरमन योगेश काळसेकर, वेदांत प्रभू, यांनी मदतकार्य करत रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केले आणि रस्ता वाहतुकीस मोकळा केला. याबरोबच याच ठिकाणी धोकादायक स्थितीत असलेले चिंचेचे झाडही तोडून बाजूला करण्यात आले. रस्त्यावर पडलेले झाड तब्बल 10 तासानंतर बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली तत्पुर्वी सकाळी या मार्गावरून जाणाऱ्या दोन एस. टी. घटनास्थळापासून मागे परतवण्यात आल्या. यामुळे कुडाळ येथे नोकरी निमित्त जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. या बरोबरच झाड पडल्यामुळे विद्युततारा तुटून बंद झालेला विद्युत पुरवठा शनिवारी दुपारपर्यंत सुरळीत झाला नव्हता. सुदैवाने रात्री उशीरा झाड पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक कमी असल्याने मोठीं दुर्घटना टळली.












