सूर्यास्ताकडे झेपावणाऱ्या “बचपन के दोस्त” च्या मित्र परिवाराने अनुभवली चैतन्याची ऊर्जा !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : जीवनाच्या ह्या वळणावर फोंडा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी ६५ व्या वर्षी, वनभोजनाच्या शाळेतील मंतरलेल्या आठवणी अनुभवल्या. “बचपन के दोस्त” हा सन ७४-७५ चा जुन्या आणि शेवटच्या एस.एस.सी चा खट्याळ वर्ग ! तो खट्याळपणा आणि यावर्षी त्याला लाभलेली अध्यात्माची जोड, यामुळे एक दिवस संस्मरणीय ठरला. बरेच वर्ष ग्रुपची इच्छा होती की, श्रीशुगेश्वर क्षेत्री, श्री वर अभिषेक आणि ब्राह्मण भोजनाने एक दिवस मिनी सोहळा संपन्न व्हावा.
श्रीक्षेत्राचे सर्वा, समीर सावंत आणि श्रीकांत दळवी यांनी पुढाकार घेऊन, जोशी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मित्रपरिवार भेटीचा कार्यक्रम नक्की केला.शिंगोबाच्या उंचच उंच शिखराच्या पायथ्याशी, मंदिराच्या कळसापर्यंत कड्यावरून पावसाळ्यात झेपवणारा धबधबा – सभोवती गर्द डोंगर झाडी आणि त्या सानिध्यात गगनगिरी महाराजांनी वसवलेले श्रीशृंगेश्वर गणपती मंदिर ! या मंदिरातील अध्यात्म आणि भाविकांची श्रद्धा तसेच प्रचिती, यांच्या कित्येक आख्यायिका इथे ऐकावयास मिळतात.आणि आपोआप आपण नतमस्तक होतो.
अशा पवित्र आणि रम्य ठिकाणी “बचपन के दोस्त”च्या या दिवसाची सुरुवात जोशी गुरुजींनी अभिषेक-पूजेने संपन्न झाली. मित्रवर्य जया जाधव यांनी सकाळीच दुग्धाभिषेकासाठी दूध आणि भोजनासाठी तांदूळ आणून श्री सेवा अर्पण केली. साधारणतः १० वा. नंतर मित्र सपत्नीक उपस्थित झाले. तोपर्यंत पूजा-अर्चा आठवण गुरुजींनी स्वादिष्ट वरण- भात, डाळ आमटी, बटाटा भाजी, सोलकढीचा बेत पूर्ण केला. या वळणावर पोहोचलेल्या आणि एकत्र जमलेल्या मित्रमंडळींनी शाळेतला तोच खटाळपणा, विनोद आठवणींची जुगलबंदी, आणि तब्येतीच्या गमतीजमतींनी गप्पा रंगल्या.महिलांचा ग्रुप तर आठवणी अन् कौटुंबिक गप्पात ओसंडून वाहत होता. भोजनाच्या सुवासाने सर्वांच्याच पोटातील कावळे ओरडू लागले. शाली वहिनींची खमंग, स्वादिष्ट चकली ने थोडेसे आळण लागले होतेच. सर्वांनी मग श्रीगणपतीसह, घंटेच्या परावर्तित होणाऱ्या निनादात, देव-देवतांच्या आरत्या, मंत्रपुष्पांजली, अभंग म्हटले. त्यानंतर ग्रुपमध्ये सर्वांना, निरामय आरोग्यासाठी आणि सुख- समाधानासाठी सांगणे ( गाऱ्हाणे ) घातले. आणि मग सर्वजण गुरुजींनी केलेल्या ब्राह्मण भोजनावर तुटून पडली. साध्या,आरोग्यदायी निसर्ग सानिध्यात आणि श्रीचा कृपाप्रसाद यामध्ये उकडीचे मोदक, माव्याची बर्फी, लोणचे सर्वांनाच आनंद देऊन गेले. आणि मग पुन्हा ‘एकदा भेटू याsss’ ह्या टॅग लाईनवर सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला या वयात सुद्धा “बचपन के दोस्त” ग्रुप एकत्र येऊन निखळ-आनंद- स्वास्थ्य-वेगळेपणा जपतो,याची चर्चा सर्वत्र ऐकू येत होती.















