वाळू उत्खनना विरोधात तोंडवळीवासियांचे खाडीपात्रात आंदोलन….!

आचरा (प्रतिनिधी) : कालावल खाडीपात्रातील तोंडवळी गाव परिसरातील वाळू उपसा करण्यासाठी शासनाने निश्चित केलेले ठिकाण हे चुकीचे असून यामुळे ग्रामस्थांच्या जमिनींची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे तसेच जमीन खचत असून त्यामुळे किनाऱ्यालागतच्या घरानां तडे जाऊन धोका निर्माण झाला आहे. वाळू उत्खनन रोखण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज आणि पाठपुरावा करून देखील बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असल्याने ग्रामस्थांच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. यामुळे ग्रामस्थांनी आज थेट खाडीपात्रात थेट होड्या घालून होड्यांमध्ये बसून आंदोलन सुरू केले आहे.
तोंडवळी कारंजेवाडी भागात चिन्हांकित पॉईंट B3. B4 येथे सतत अवैधरित्या वाळूचा उपसा अहोरात्र केला जात आहे. याबाबत सतत निवेदन महसूल विभागाला देऊनही याबाबत प्रशासनाकडून कारवाई झालेली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी खाडीत होद्यामध्ये बसून साखळी आंदोलन सकाळी चालू केले. ग्रामस्थ प्रमोद पाटील, दशरथ वायंगणकर, पांडुरंग कांदळकर, किशोर पेडणेकर, प्रसाद पेडणेकर, दत्तप्रसाद तिरवडेकर, मयुर चेंदवणकर, ओंकार चेंदवणकर, संदिप पेडणेकर, प्रज्ञा येसजी, सुचिता चेंदवणकर, जनार्दन पाटील, शिल्पा गोलतकर, मिलिंद वायंगणकर, यांसह बहुसंख्य ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

महिला पुरुष मोठया संख्येने सकाळ पासून खाडीपत्रात उतरून होड्यामध्ये बसून आंदोलनास सुरवात केली सुरवातीला प्रशासनाकडून मालवण पोलीस,आरोग्य सेविका आचरा मंडल अधिकारी अजय परब, तलाठी रवी शेजवळ हजर झाले होते त्यांना ग्रामस्थांच्या रोशाला सामोरे जावे लागले. जोपर्यंत सक्षम अधिकारी येऊन उत्तर देत नाही तोपर्यंत आपण इकडून न हलण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. सकाळ पासून भर उन्हात खाडीपत्रात बसून महिलांनी आपले उपोषण तीव्र केले होते. होड्यात बसलेल्या काही महिलांना त्रास जाणवू लागला होता मात्र त्यांनी बाहेर येण्यास नकार देत आंदोलन चालूच ठेवले होते. तोंडवळी आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी यावेळी आंदोलनकर्त्यांना उपचार देत होते यावेळी 108 रुग्णवहीका तैनात ठेवण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात वाळू उपसा होत आहे.आतापर्यंत ज्या भागात टेंडर लागले नव्हते किंबहूना ग्रामस्थांनी टेंडर लावू दिले नव्हते त्या भागात टेंडर लागले आहे, लावून घेतले आहे असा आमचा आरोप आहे. याबाबत कोणतीही प्रसिद्धी झाली नाही. अचानक होडीवाले घरासमोर येतात तेव्हा टेंडर लागल्याचे समजते. होडीमालक दादागिरी करतात आम्हाला टेंडर मिळाले आहे.पण याबाबतचे नियम अटी ते पाळताना दिसत नाहीत.याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली पण अजून त्याची दखल घेतली गेली नाही ती का घेतली जात नाही त्याचे प्रशासनाने उत्तर द्यावे असे तारका पेडणेकर यांनी सांगितले.

यावेळी आलेले बंदर विभागाचे सहा.बंदर निरीक्षक अनंत गोसावी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनीमेरीटाईम बोर्ड जलालेख विभागाकडून हद्द निशि्चितीबाबत येत्या 20तारीखला सर्वे करण्याबाबत तारीख निश्चित झाल्याचे सांगितले. मात्र आंदोलक सर्वे होईपर्यंत वाळू उपसा बंद ठेवण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने आंदोलन उशिरापर्यंत सुरुच होते.

error: Content is protected !!