ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या अंतर्गत भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे व कोथरूड शाखा पुणे यांच्यावतीने ७ मार्च रोजी कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय, हात आणि पोलिओ झालेल्या व्यक्तींना कॅलिपर देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांची मोजमापे घेवून १५ मे २०२५ हे कृत्रिम अवयव एका कार्यक्रमाद्वारे बसवून दिले जाणार आहेत, अशी माहिती भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणेचे विश्वस्त विनय खटावकर यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन मधील बैठक सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खटावकर बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा कार्यवाह लवू म्हाडेश्र्वर, सेवा भारती संघटनेचे जिल्हा सचिव जयेश खाडिलकर, इंजिनियर श्रीकृष्ण शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री खटावकर यांनी, शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि अत्याधुनिक मोडयूलर पायविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी शिबीर माध्यमातून देण्यात येणाऱ्या अत्याधुनिक कृत्रिम मॉडयुलर पायाची कमर्शियल किमंत ५० हजारापेक्षा जास्त व हाताची किमंत २० हजारापर्यंत आहे. असे कृत्रिम अवयव ह्या शिविरात २०० दिव्यांगांना देणार आहोत. तसेच या शिबिरात मिळणारा पाय परंपरागत जयपूर फूट पेक्षा कसा अत्याधुनिक आहे त्याची माहिती पण सांगितली.
भारत विकास परिषदेकडून ही सेवा मोफत देण्यात येते. विकलांग पुनर्वसन केंद्राला कोणतीही सरकारी मदत नसल्याने कागदपत्रात न अडकता, कोणतेही निकष न लावता सर्व दिव्यांगांना ही मोफत सेवा दिली जाते. समाजासाठी चालविण्यात येणारा हा सेवा यज्ञ आहे. या सेवा यज्ञात महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. आता सहभागी झाली असून अन्य इतर कंपन्यांचे, संस्थांचे आर्थिक सहकार्य संस्थेला मिळत असते. भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव, राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी संस्था आहे. सद्यस्थितीत विविध राज्यात मिळून संस्थेची कायमस्वरूपी १३ विकलांग केंद्र आहेत. भारतातील १३ केंद्रापैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी विकलांग केंद्र, पुणे येथे १९९८ पासून कार्यरत असून दरवर्षी सुमारे ३ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात, व कॅलिपर बसविण्यात येतात. केंद्रातील वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्र सामुग्री व प्रशिक्षित तज्ञांच्या द्वारे सर्व कृत्रिम अवयव बनविले जातात. पाय बसविल्यानंतर अपंग व्यक्ती चालणे, पळणे, पोहोणे, उडी मारणे, वाहन चालविणे इत्यादी प्रकारची दैनदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत केंद्रावर तज्ञांमार्फत सराव, मार्गदर्शनही केले जाते.
डिसेबर महिन्यात पुणे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उपस्थितीत महा-दिव्याग शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १०३६ लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव देण्यासाठी मोजमाप घेण्यात आले असून त्याची लवकरच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंद होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आम्ही शिबीर घेत आहोत. या शिबिरात पूर्व नोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही. प्रथम नोंदणीला प्राधान्य असल्याने दिव्यांगांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. यासाठी साठे ९१७ ५५५८३५६ आणि कुलकर्णी ८७६६४ ५३१९२ येथे नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
