आचरा (प्रतिनिधी) : ओरोस क्रीडा संकुल येथे सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्यावतीने पार पडलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या सातपुते बंधू भगिनीचा वरचष्मा पाहायला मिळाला. आशीर्वाद प्रमोद सातपुते याने 80 मीटर धावणे, 300 मीटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. तर दिवीजा संदीप सातपुते हिने 80 मीटर धावणे प्रकारात सुवर्ण पदक तर 300 मीटर धावणे क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले. या स्पर्धेसाठी अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडा प्रशिक्षिका चंद्रकला सातपुते यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी आशीर्वाद, दिविजाची निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अश्वमेधचे संचालक सिद्धेश आचरेकर, मुख्य प्रशिक्षक अनिकेत पाटील, सल्लागार स्वाती आचरेकर यांनी अभिनंदन केले आहे.
