विशेष संपादकीय
राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाहतूक शाखेत सध्या 44 अंमलदार आणि अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखणे, वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणे ही महत्त्वाची कामगिरी जिल्हा वाहतूक दलाकडे असते.त्यासाठी जिल्ह्याभरात काही पॉईंट निश्चित करून तिथे वाहतूक अंमलदार नेमले जातात. पण दुर्दैवाने काही पॉइंटवर वर्षांनुवर्षे तेच तेच कर्मचारी नियुक्ती ला असतात आणि त्यातूनच सुरु होतात वरकमाई शोधण्याचे मार्ग. एकाच पॉइंटवर असल्यामुळे त्या मार्गावरून ये जा करणारी अवजड वाहने, भाजीपाला वाहतूक , कोंबडी पक्षी वाहतूक करणारी वाहने आणि त्याहूनही जास्त मलई मिळवून देणारी म्हणजे अवैध दारू, चिरे, वाळू वाहतूक करणारी वाहने ही अगदी तोंडपाठ झालेली असतात. या वाहनचालक आणि मालकांकडून मिळणाऱ्या वरकमाईच्या लोभापायी अनेक अंमलदार एकाच पॉइंटवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. जणू तो पॉईंट म्हणजे त्या शाखेतील 5 वर्षांच्या आपल्या सर्व्हिस काळात स्वतःच्या नावाने सातबारा करून घेतलाय अशी समज हे अंमलदार करून घेतात. सध्या जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यातील दाणोली पॉईंट हा जोरदार चर्चेत आहे. आंबोली घाटमार्गातून अवजड वाहनांना वाहतुकीला बंदी असतानाही दरदिवशी किमान 15 हून अधिक अवजड वाहने या घाटातून या पॉईंट वर आंबोलीच्या दिशेने सुटतात कशी ? उत्तर आहे प्रतिवाहन काही हजारांची मलई. याच मार्गावरून बेळगाव मार्गे भाजीपाला तसेच पोल्ट्री व्यावसायिक कोंबडी पक्षी वाहनांतून आणतात.त्यांच्याकडून वसूल केली जाणारी मलई वेगळी, अवैध गोवा बनावटीची दारूही याच पॉईंट वरून पुढे कशी जाते ? याला कारणीभूत वाहतूक शाखेत कार्यरत असल्यापासून फक्त दाणोली पॉइंटवरच कायमस्वरूपी कार्यरत असणारी चौकडी नाही काय ? अलीकडेच जिल्ह्यातील सर्वोच्च अधिकाऱ्याने जेव्हा पॉइंटवर वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नकळत सलग सरप्राईज व्हिजिट दिल्या तेव्हा कर्मचाऱ्यांकडून वाहने थांबवून सुरू असलेला प्रकार पाहून ते अधिकारीच स्वतः सरप्राईज झाले होते. आणि त्यानंतर दाणोली पॉइंटवर वाहतूक अंमलदारांच्या ड्युटीचे रोटेशन सुरू झाले. आणि इथेच आपल्या दरदिवशी च्या वरकमाईत अखंडता येऊ लागलेली पाहून त्या चौकडी ने आपल्याच वरिष्ठांची बदनामी करण्याचा सपाटा लावला. सध्या सिंधुदुर्ग पोलीस दलात जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी असलेले एपीआय अनिल व्हटकर यांच्यावर हुक्का पार्लरमध्ये उपस्थित असल्याबद्दल कोल्हापूर येथे भाग 6 नुसार गुन्हा दाखल झाला होता.ही घटना सप्टेंबर 2022 मध्ये घडली होती. या घटनेवेळी एपीआय व्हटकर हे सिक लिव्ह वर आपल्या गावी कोल्हापूर ला होते. या बाबत एपीआय व्हटकर यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाल्यानंतर जेव्हा व्हटकर ड्युटीवर हजर झाले तेव्हा त्यांची बदली कंट्रोल रूम ला करण्यात आली. एपीआय व्हटकर यांच्यावर खात्यांतर्गत तरतुदीनुसार पी ई ( प्राथमिक तपासणी) लावण्यात आली. इथे एक बाब नमूद करावीशी वाटते की जेव्हा गंभीर गुन्हा अधिकारी कर्मचाऱ्यावर दाखल होतो तेव्हा त्याची खातेनिहाय चौकशी केली जाते.व्हटकर यांची पिई करण्यात आली. त्यानंतर त्यांना वाहतूक शाखा प्रभारी पद देण्यात आले. आता इथे एक बाब महत्वाची आहे की व्हटकर यांच्याबाबतीत हुक्का पार्लर ची घडलेली घटना ही सप्टेंबर 2022 मधील आहे. तर दाणोली पॉईंट वरील त्या चौकडी ची उचलबांगडी ही सरप्राईज व्हिजिटमध्ये सर्वोच्च अधिकाऱ्याच्या नजरेस आलेल्या संशयास्पद अनुचित प्रकारानंतर मागील महिन्याभरात केलेली आहे. मग जर सप्टेंबर मध्ये एपीआय व्हटकर यांचे घडलेले हुक्का पार्लर प्रकरण आता 7 महिन्यानंतर त्या चौकडीला दाणोली पॉईंट वरून बदलल्यानंतरच का गाजतेय? वाचक हो …या लेखप्रपंचातून आम्हाला एवढेच सांगायचे आहे की कडक शिस्ती च्या पोलीस दलातही दरदिवशी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आपल्या हातातून निसटून जातेय म्हणून आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याना बदनाम करण्याचा कट रचणाऱ्या मस्तवाल कर्मचाऱ्यांचे काय ? आपल्या या कृतीने आपल्यासोबत कर्तव्य बजावणाऱ्या अन्य 40 कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलिन होतेय याचेही भान या चौकडीला नाहीय. एपीआय व्हटकर यांच्यावर हुक्का पार्लर प्रकरणात कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी, ती होईलच. पण केवळ हुक्का पार्लर चा मुद्दा काढून जर व्हटकर यांच्या आजच्या कर्तव्यपालनावर शंका उपस्थित केली जात असेल तर ते चुकीचे आहे. जर वाहतूक शाखेचे इंचार्ज म्हणून त्यांच्याकडून अवैध धंद्यांना पाठबळ मिळत असेल तर व्हटकर यांची वाहतूक शाखेतून बदली व्हायलाच हवी हे आमचेही ठाम मत आहे. पण आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात कुभांड रचणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वचक बसलायलाच हवा हेही खरंय.
सोन्याचे अंडे देणारी कोंबडी म्हणून ट्रॅफिकचा एकच अंमलदार एकाच चेकपोस्ट दिसतोय आणि त्याला बदलले म्हणून वेळ साधून API अनिल व्हटकर यांची सुरू आहे. यासाठी तुमचा पत्रकाराचा पिंड तळमळत आहे हे स्वाभाविक आहे. कदाचित तुम्हाला बघून त्या कोंबड्या फडफडायच्या बंद झाल्या असतील.
मात्र या असंख्य कोंबड्या पाळून सोन्याची अंडी वरपर्यंत पोचवणारा हुक्काबाज API व्हटकर यांच्याबद्दल मात्र तुम्हाला सहानुभूती कशासाठी वाटावी ?
की हल्ली कोंबड्यांकडे लक्ष न देता कोंबड्यांच्या मुकादमाकडेच संबंध प्रस्थापित करायचे ठरविले आहे चौथ्या स्तंभाने ?