बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्या वतीने सन्मान
चौके (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्यावतीने शिवजयंती हा उत्सव विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला. यावेळी निरामय केंद्र कोलगावच्या सचिव वंदना घाणेकर याना बापूभाई शिरोडकर स्मृति आदर्श समाजसेविका पुरस्कार व विजय चौकेकर याना संजय नाईक स्मृति आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार देऊन त्यांच्या समाजातील उत्तुंग कामगिरी बद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपक भोगटे यांनी बापूभाई शिरोडकर पुरस्काराचे २३ वे वर्ष असून संजय नाईक पुरस्कार ह्यावर्षी पासून देण्यात येत असल्याचे सांगितले. सेवांगणचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या वर्षात विविध उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
सत्कारमूर्ती वंदना घाणेकर यानी आपले मत मांडत असताना १० वीत असताना बाबा आमटे यांच्यावरील आनंदवन हा धडा वाचल्यावर समाजसेवेची आवड निर्माण झाली. तसेच कट्टा येथे राहात असताना बापूभाईच्या देखण्या आणि सेवाभावी व्यक्तिमत्वाने आपण भारावून गेले होते. निरामय केंद्राद्वारे विद्यार्थ्याना मदत करता आली याचे समाधान असल्याचे म्हटले. सत्कारमूर्ती विजय चौकेकर यानी आपल्या बालपणा पासून शिक्षक म्हणून सेवानिवृत होईपर्यंतचा प्रवास विशद केला. व यापुढे आपण अंधश्रद्धा निर्मूलन कामासाठी सर्वस्वाने वाहून घेणार असल्याचे सांगितले. यावेळी संजय नाईक यांचे बंधू महेश नाईक यानी संजय नाईक यांच्या जीवनातील मला माहित नसलेले पैलू आज मला समजले असे मत व्यक्त करत संजय नाईक यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशे स्मारक उभारण्यात येणार असून सेवांगणने पुरस्कार देऊन नाईक सरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली याबद्दल सेवांगणला धन्यवाद दिले.
या कार्यक्रमप्रसंगी सेवांगणचे अध्यक्ष ॲड देवदत्त परुळेकर यांनी आजचे पुरस्कार विजेते व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य याची सांगड घातली. शिवरायांनी कधीही मुहुर्त काढला नाही महिलांच्या मानसन्मानासाठी स्वतःच्या सरदारांना शिक्षा केली. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या या गुणांचा सर्वानी अंगिकार केला तर खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी झाली असे म्हणावे लागेल. यावेळी सुरेश ठाकूर, उन्मेष सावंत, उदय पंडित यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कट्टा परिसरातील ५ गरीब मुलीना उन्मेष सावंत यांच्या माध्यमातून ग्रँट इन्स्ट्रमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CRS फंडातून सायकलचे वितरण करण्यात आले. तसेच वराडकर हायस्कूलच्या साने गुरुजी प्रश्नमंच स्पर्धेतील अव्वल क्रमाकांच्या मुलीना सन्मानीत करण्यात आले.
या कार्यक्रमास रश्मी पाटील, प्रसाद घाणेकर, विकास म्हाडगुत, बापू तळावडेकर, गीता नाईक, नाईक, वीणा म्हाडगुत, भाट, संध्या म्हाडगुत, ॲड राजीव बिले, चांदरकर सर, पेंडूरकर सर, अर्जून पेंडूरकर, भारत पेंडूरकर, परब, आवळेगावकर, काळसेकर, विद्या चिंदरकर, जांभवडेकर, मंदार सांबारी, सकपाळ, कृष्णा पाताडे, आकेरकर, सदानंद कांबळी, गुरुनाथ ताम्हणकर, अनिल माळवदे, तेजल ताम्हणकर, कथामालेचे कार्यकर्ते शिक्षक पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी लाड तर आभार बाळ नांदोसकर यांनी मानले.













