अवघ्या ४८ तासांत कणकवली पोलिसांनी चोरीचा लावला छडा
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जयभवानी मोबाईल रिपेरिंग आणि ॲक्सेसरीज दुकानातून रोख रुपये ४५ हजार रुपये चोरीला गेल्याची घटना १ मार्च रोजी उघड झाली होती. ही चोरी फिर्यादी च्या जातभाई असलेल्या एका मोबाईल शॉपी दुकानदारानेच केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.कणकवली पोलिस ठाण्याचे पीएसआय अनिल हाडळ हवालदार विनोद सुपल यांनी अवघ्या ४८ तासांत चोरी करणाऱ्या ला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल रोख रुपये ४५ हजार रुपये हस्तगत केले आहेत. विक्रमसिंग हिमतारा पुरोहित ( वय २८, सध्या रा.तेली आळी , मूळ रा.राजस्थान ) असे आरोपीचे नाव आहे. जयभवानी मोबाईल दुकान च्या काउंटर मधून रोख रुपये ४५ हजारांची चोरी झाल्याची फिर्याद कणकवली पोलिस ठाण्यात १ मार्च रोजी दाखल करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हाडळ आणि हवालदार सुपल यांनी घटनेचा तपास सुरू केला. फिर्यादी ने त्याचा जातभाई असलेल्या एका मोबाईल शॉपी दुकानदारावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी त्या संशयिताकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला तो मी नव्हेच चा सूर लावला. अखेर चोरी झालेल्या जयभवानी मोबाईल दुकान ॲक्सेस असलेल्या सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी चेक केले असता आरोपी विक्रमसिंग हा चोरी करताना आढळून आला. पोलिसी हिसका दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल रोख रक्कम ४५ हजार पोलिसांनी रिकव्हर केले आहेत.









