खारेपाटण (प्रतिनिधी) : समता शिक्षण संस्था,पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत दि. ८ मार्च व ९ मार्च २०२५ ला विश्वासनगर, कुंडाणे येथे ‘मुलांसाठी दोन दिवसीय कौशल्य विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात आदिवासी वस्ती विश्वास नगर कुंडाणे व भिल्ल वस्ती मोराणे येथिल मुलांच्या गटासाठी आयोजित करण्यात आला होता यामध्ये २५ मुले सहभागी झाली होती.या कार्यक्रमासाठी प्रा.विलास वाघ मेमोरिअल फाउंडेशन, पुणे यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली होती.तर शिबिराच्या पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून समता शिक्षण संस्थेचच्या अध्यक्षा आदरणीय प्रा. उषाताई वाघ, डॉ. जालिंदर अडसुळे (सचिव, समता शिक्षण संस्था, पुणे व संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी प्रकल्प धुळे), कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय प्रा. रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे), व कुंडाणे गावातील माजी सरपंच गवरलाल पाटील, ग्रामपंचायत सदस्या जयवंताबाई वाघ ,प्राथमिक शाळा विश्वास नगर कुंडाणे येथिल शिक्षक मगन गावित इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. सुनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्याच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व समता शिक्षण संस्थेचे संस्थापक कालकथित प्रा. विलास वाघ साहेब यांच्या प्रतिमांना हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर शिबिरातील विद्यार्थांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत आदरणीय डॉ. जालिंदर अडसुळे हे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्पा अंतर्गत कुंडाणे गावात वृद्ध, महिला व बालकांच्या गटांसोबत कार्य व वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. हि कार्यशाळा मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महत्वाची आहे. त्यांनी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे व त्याच्यामुळे प्रकल्पाचा उत्साह वाढतो असे मत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा व उद्घाटक प्रा. उषाताई वाघ यांनीही शिबिरातील विद्यार्थांशी संवाद साधून ‘सती सावित्रीची’ गोष्ट सांगितली व मुलांशी हितगुज केले. त्यानंतर ‘कला आणि हस्तकला कार्यशाळा ‘ सत्रात माया विजय वाकचौरे यांनी शिबिरार्थी मुलांना रंगीबिरंगी कागदे, प्लास्टिकच्या बाटल्या इत्यादी वस्तू पासून आकाशकंदील, फुलदानी वस्तू बनवण्याचे शिकवले आणि विद्यार्थांनी ही आनंदाने स्वतः वस्तू बनविल्या तर दुपार नंतर मुलांसाठी पारंपारिक खेळ घेण्यात आले. त्यात लगोरी ,विट्टीदांडू ,गोट्या, इत्यादी खेळ मुलं आनंदाने खेळले.
त्याचप्रमाणे शिबिराच्या दुसऱ्या दिवशी दि. ०९/०३/२०२५ रोजी कौशल्य विकास शिबिरांतर्गत मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १००मीटर धावणे, लिंबू चमचा, संगीत खुर्च्या या स्पर्धामध्ये सहभागी होऊन विद्यार्थांनी आनंद लुटला. त्यानंतर दुपारच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील सेमिनार हाल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉ. जालिंदर अडसुळे व प्रमुख पाहुणे आदरणीय अॅड. प्रतिभा गवळी ( सदस्य, विलास वाघ मेमोरिअल फाउंडेशन,पुणे) हे होते. कार्यक्रम संयोजक आदरणीय प्रा.रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे) हे होते.
त्यानंतर विद्यार्थांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यात प्रथम फॅन्सी ड्रेस कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यात कुंडाणे व मोराणे या दोन्ही गावातील विद्यार्थांच्या गटाने सावित्रीबाई फुले, ,बिरसा मुंडा, विर एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षक अशा वेशभुषा विद्यार्थांनी सादरीकरण केले. त्यानंतर पारंपारिक नृत्य प्रकारात आदिवासी गाणी, समूह नृत्य, मराठी, अहिराणी गाण्यात मुलांनी भाग घेतला. यात मुलांचा उत्साह भरपूर होता. सदर कार्यक्रमाला परीक्षक म्हणून मीना गावित (शिक्षक, भागाबाई आनंदा वाघ प्राथमिक आश्रमशाळा मोराणे) व सुनिता वाघ (अधिक्षक, कस्तृभा मुलींचे वसतिगृह मोराणे) हे होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थांशी संवाद आणि अभिप्राय घेण्यात आला. त्यावेळी मुलांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले कि, आम्हाला शिबीराचे जेवण आवडले, वेगवेगळे खेळ खेळायला मिळाले व खूप आनंद मिळाला. हा अनुभव आम्हाला पहिल्यांदाच मिळाला असा अनुभव आम्हाला कुठेच मिळाला नाही. असे सांगितले.
क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय असलेल्या विद्यार्थांना बक्षिसे देण्यात आली. या शिबिरात एकूण २५ विद्यार्थांचा सहभाग होता. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रसंगी मयुरी जाधव हिने सूत्रसंचालन तर आभार प्रा. सुनिता पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमास सुभाष बागुल, गणेश उफाडे व क्षेत्रकार्याचे विद्यार्थी रोहन पाडवी, शिल्पा पावरा यांचे सहकार्य लाभले. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

