तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,तळेरेचे संस्थापक स्व.प्रिन्सीपल वामनराव महाडिक (आप्पा) यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन प्रशालेत सोमवार दि.17 मार्च 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रशालेच्या डॉ.एम.डी. देसाई सभागृहामध्ये करण्यात येणार आहे.
सायन हॉस्पिटल,मुंबईचे माजी वैद्यकीय अधिकारी व तळेरे गावचे सुपुत्र डॉ.प्रकाश बावधनकर समारंभाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत.तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, चांदमल तारचंद बोरा महाविद्यालय,शिरूर चे मराठी विभाग प्रमुख बाळकृष्ण लळीत, जमीन देणगीदार रमाकांत वरूणकर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तळेरे सरपंच हनुमंत तळेकर,उपसरपंच रिया चव्हाण सन्माननीय अतिथी असणार आहेत.
वामनराव महाडिक जन्मत:च कुशाग्र बुद्धीचे होते. साक्षात देवी सरस्वती त्यांच्या वाणीत वास करत होती. त्यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे कार्य केले आहे…आणि…म्हणून या जन्म शताब्दी सोहळ्याचे औचित्य साधून यावर्षीपासून शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणारे शिक्षक म्हणजेच “आदर्श शिक्षक पुरस्कार”हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शाल,श्रीफळ,सन्मान चिन्ह,सन्मानपत्र,रोख रक्कम 5555/-असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
चित्रा ठाकूर,हेमांगी महाडिक, राधा कडुसकर,घनश्याम कडूसकर,शारदा भस्मे,विजय भस्मे,कश्मिरा महाडीक, प्रेषित महाडीक,शाळा स.अध्यक्ष अरविंद महाडीक,प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शाळा समिती सदस्य व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी दशक्रोशीतील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती,जाणकार,पालक,माजी विद्यार्थी या सर्वांनी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.