बांदिवडे पालयेवाडीसाठी टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी !

मसुरे (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या उधाणाचा मोठा फटका बांदिवडे पालवेवाडी भागातील रहिवाश्यांना बसला असून या भागातील बहुतांश विहिरिंचे पाणी खारे झाले आहे. या भागासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी बांदिवडे विकास सोसायटी चेअरमन व माजी प. स. सदस्य प्रफुल्ल प्रभू यांनी केली आहे. कालावल खाडी पात्रा लगतचा भगवंतगड येथील खार बंधारा नादुरुस्त असून या बंधाऱ्याला झडपा नसल्याने भरतीच्या वेळी खारे पाणी भगवंतगड किनाऱ्याने बांदिवडे पालयेवाडी पर्यंत येते. मार्च महिन्या नंतर या भागातील विहिरिंचे पाणी कमी होते. त्यामुळे एकीकडे पाणी टंचाईचा सामना करतानाच विहिरिंचे पाणी सुद्धा खारे बनले आहे. खारभूमी बंधाऱ्याचे काम प्रलंबित असल्यामुळे पौर्णिमेच्या वाढलेल्या भरतीमुळे बहुतांश विहिरीमध्ये खारे पाणी झाले असून, ते पिण्यास अतिशय अयोग्य झालेले आहे. विहिरीचे पाणी खारट झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. गाई-गुरांचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. टंचाईळे पिण्याच्या पाण्याची अतिशय गैरसोय होत आहे. खार बंधारा होण्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यांत आला. परंतु अद्याप खार बंधारा न झाल्यामुळे गावांतील तसेच या परिसराला लागून असलेल्या त्रिंबक भगवंतगड- चिंदर येथील नदीकाठच्या जमिनी नापिकी झालेल्या आहेत.अनेक विहिरी खाऱ्या पाण्यामुळे खराब झालेल्या आहेत.

तरी पाण्याची निकड लक्षात घेऊन तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रफुल्ल प्रभू यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!