सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : घाटपायथ्याला असणाऱ्या गावातील पुनर्वसन झालेल्या गावठाणात एका विकासमंडळाच्या बैठकीत चक्क विकासकामांवरून तू तू मै मै झाली आणि बघता बघता मुद्द्यावरून प्रकरण गुद्द्यावर आले. नावातच ” तेल ” असणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्याने रागाच्या भरात ” गोरापान ” असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कानशिलात ठेवून दिल्या आणि क्षणातच गोरापान असणाऱ्या त्या कार्यकर्त्यांचा चेहरा काळा पडला. मंजूर असलेल्या विकासकामांबात मंडळाची बैठक देवीच्या मंडपात सुरू होती.बैठकीत विकासकामांवरून शाब्दिक वाद वाढत गेले. त्यातून दोन कार्यकर्त्यांत वाद वाढला. त्याचे पर्यवसान हमरातुमरीत होऊन शेवट गुद्द्यावर झाला. अलीकडे काही वर्षे या गावठाणात दोन गट पडले असून दोन गटांत कायमच कुरबुरी सुरू असतात. मात्र या बैठकीत एकाच गटात शाब्दिक वादाचे रूपांतर होऊन एकसंघ असलेल्या त्या गटातही दुफळी निर्माण झाली. त्यानंतर या वादावर पडदाही टाकण्यात आला. मात्र झाल्या प्रकाराची जोरदार चर्चा घाटपायथ्याच्या गावात खुमासदारपणे सुरू आहे.