तळेरे (प्रतिनिधी) : ‘राष्ट्राचा नागरिक घडताना आणि घडवताना’ या विषयावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्यावतीने तळेरे येथील दळवी महाविद्यालयात ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थी हा राष्ट्राचा भावी नागरिक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची दशा आणि दिशा यासंदर्भात पालक नित्य चिंताग्रस्त असतात. शाळेत जाऊन शिक्षण घेणे हे आता जीवनातील पुढील वाटचालीसाठी नित्याचे आणि जणू सक्तीचे झाल्यासारखे आहे. शिक्षणाच्या निमित्ताने विद्यार्थ्याला काय प्राप्त होणे आवश्यक आहे यावर योग्य सदिश मार्गदर्शन होणे आज अत्यंत आवश्यक झालेले आहे. या पार्श्वविषयाच्या अनुषंगाने तळेरे येथील जि. प. प्राथमिक शाळा क्र.१ च्या वतीने तळेरे येथे ‘राष्ट्राचा नागरिक घडताना आणि घडवताना’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ. उदय निरगुडकर यांनी विद्यार्थ्यांना शाळा आणि विद्यालयात शैक्षणिक ज्ञानाची प्रात्यक्षिकातून उकल करून देण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. विद्यार्थी परीक्षेत किती गुण मिळवतो यापेक्षा विद्यालयात घेतलेले शिक्षण आणि त्यातून आलेली समज आणि उमज ही त्याच्या अंगवळणी कितपत बाणली आहे हे अधिक महत्त्वाचे असल्याचे डॉ. निरगुडकर यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी शिक्षकांनी शिक्षणातून विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला प्रेरणा द्यायला हवी. विद्यार्थ्यांना चिकित्सक प्रश्न निर्माण व्हायला हवेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्यात आतुरता आणि आत्मीयता निर्माण व्हायला हवी. कार्य, कारण आणि भाव यांची सांगड ही अध्ययनातून आणि अध्यापनातून होणे गरजेचे आहे. हे कसे साधता येईल याचे मार्गदर्शन निरगुडकर यांनी काही उदाहरणे व प्रात्यक्षिके सुचवून यावेळी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक यांना संबोधून केले. शाळा हे विद्यार्थ्याचे रम्यतेतून प्रात्यक्षिक ज्ञान देणारे साधन असायला हवे आणि विद्यार्थी शाळेतून रमून उत्साहाने घरी जायला हवेत यावर त्यांनी आपल्या वक्तव्यातून भर दिला. शाळेत मिळणाऱ्या ज्ञानाचा व्यवहारात कुठे व कसा उपयोग करता येईल हे विद्यार्थ्याला नेमके आकलन व्हावे आणि या आकलनाचा व्यवहारात उपयोग करण्याची कार्यक्षमता त्याच्यात यावी या उद्देशाने शाळेमध्ये अध्यापन आणि अध्ययन व्हायला हवे अशा आशयाचे व्याख्यान निरगुडकर यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी विचारमंचावर उपस्थित मान्यवर डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी आराध्य दैवत मानले जाणारे छत्रपती शिवाजी हे जसे सर्वांगीण व्यावहारिक ज्ञान घेऊन, प्राप्त ज्ञानाचा धडाडीने आणि विवेकाने प्रसंगी व्यवहारीक उपयोग करून रयतेचे जाणते राजे बनले तसे विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या कवी भूषण व रामदास स्वामी यांनी वर्णन केलेल्या आदर्शांचा मागोवा घेत, त्यांना सदैव परमेश्वराप्रमाणे स्मरण करीत, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या नांदीचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी शिक्षणातून साधावी असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. जिजाऊंनी शिवरायांना केलेल्या मार्गदर्शनाचा आणि संस्काराचा उल्लेख करून जिजाऊंसारखे पालकत्व पालकांनी स्वीकारून आपल्या पाल्याला आदर्शमय घडवावे असाही उद्बोध डॉक्टर कुलकर्णी यांनी याप्रसंगी केला.
यावेळी विचार मंचावरील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजपा मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, नशाबंदी मंडळ सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षा श्रावणी मदभावे, दळवी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक हेमंत महाडिक, जि. प. शाळा तळेरे क्र.१ चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर यांच्यासह तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराचे अध्यक्ष उदय दुदवडकर, उपाध्यक्ष गुरु सावंत, श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, शरद वायंगणकर, राजू वळंजु, संदीप घाडी, दिनेश मुद्रस इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागतानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शोभा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.













