वन विभागाने “माकड पकड” मोहिमेंतर्गत पिंजरे बसविण्याची मागणी !
इतरत्र पकडलेली माकडे सह्याद्री पट्ट्यात सोडल्याचा संशय !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गेल्या दोन महिन्यात फोंडाघाट- पावणादेवी ( हेळेवाडी ) येथील बागायतदार- शेतकऱ्यांच्या बागेतील नारळ,आंबा, सुपारी, इत्यादी पिकांची माकडे ( केलडी) यांचे कडून नासधुस केली जात असून पिकांचे नुकसान होत आहे.ग्रामीण भागातील फटाके इत्यादी सारख्या उपायांनाही माकडे दाद देत नाहीत.काही वेळा एका बागेतून हुसकावल्यावर दुसऱ्या बागेत जाऊन नुकसान करतात. त्यामुळे येथील बागायतदार हवालदिल झाले आहेत.
आठ हा दहा दिवसापूर्वी फोंडा वनविभागातर्फे बागायतदार दत्तात्रय सिताराम रेडकर यांच्या बागेची पाहणी करून, माकडांनी केलेल्या नारळ – माडाच्या पिकाचे नुकसानीचा पंचनामा केल्याचे कळते. मात्र शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतलेली नाही. त्यांचे सह अनंत तेली, महेश गावकर, अभिमन्यू गावकर,विजय रेडकर ,श्रीकृष्ण रेडकर, कौस्तुभ रेडकर इत्यादी वाडीतील शेतकऱ्यांनी वनविभागाला “माकड पकड मोहीम” तातडीने सुरू करून, पिंजरे बसवावेत व या त्रासापासून दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी केली आहे.
चालू वर्षीच फोंडाघाट ह्या पट्ट्यात माकडांचा (केलडी) चा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे इतर गावातून पकडलेली माकडे अधिवासाच्या नावाखाली सह्याद्री पट्ट्यात सोडण्याचा संशय शेतकरी व बागायतदारांमध्ये व्यक्त होत आहे. या संकटाची गांभीर्याने नोंद घेऊन वनविभागाने तातडीने मोहीम राबवावी अशी आग्रही मागणी होत आहे.













