ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील – पराग मोहिते
तळेरे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या आपल्या हेल्पलाईन नंबरवर कळवा आम्ही आपल्यासाठी सदैव उपलब्ध असून आपल्या अडचणी निश्चितच तातडीने सोडविल्या जातील. तसेच, महिलांच्या विविध समस्यांवर कणकवली पोलिस अंमलदार पराग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. साळीस्ते ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी साळीस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, ग्रामसेवक विशाल वरवडेकर, पोलिस पाटील गोपाल चव्हाण, महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुरेश साळीस्तेकर, मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष वामन ताम्हणकर आदी उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व महिला यांना येणाऱ्या विविध अडचणी याबाबत सविस्तर चर्चा झाली. समस्या निर्माण झाल्यानंतर नेमके काय केले पाहिजे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, कोणत्याही ज्येष्ठ नागरिक अथवा महिलांना अडचण आल्यास तातडीने काय केले पाहिजे, याबाबत विस्तृत माहिती दिली.
या पोलिस ग्रामसंवाद कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वामन ताम्हणकर, मंगेश कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्वांचे स्वागत आणि आभार प्रभाकर ताम्हणकर यांनी तर आभार विशाल वरवडेकर यांनी मानले.


