सामाजिक बांधिलकी जपत सविता आश्रमाला केले किराणा साहित्याचे वाटप…
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हयातील पोलीस कर्मचाऱ्यां मधील एक युवा कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार कै. प्रज्ञेश प्रदिप वानीवडेकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मे- २०२५ मध्ये दु:खद निधन झाले. यांच्या स्मरणार्थ ते ज्या सिंधुदुर्ग पोलीस बॅच- २०१० मध्ये सहभागी होते. त्या बॅच मधील सहकारी पोलीस अंमलदारांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सविता आश्रमातील बांधवांसाठी किराणा साहित्याचे व भिंतीवरील घड्याळाचे नुकतेच सहाय्य करण्यात आले.
सिंधुदुर्ग पोलीस बॅच- २०१० च्या सहकाऱ्यांनी हा चांगला उपक्रम राबाबत सामाजिक दातृत्वाचा एक चांगला संदेश समाजाला दिला असल्याचे, सविता आश्रमचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी यावेळी सांगितले. तर सिंधुदुर्ग पोलीस बॅच- २०१० मधील सर्व पोलीस अंमलदार अधिकारी वर्गाचे त्यांनी तोंडभरून कौतुक करत व अशा सामाजिक उपक्रमांमुळे निराधारांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सिंधुदुर्ग पोलीस बॅचमधील अंमलदार समील वारंग, अमोल धुरी,चैताली देसाई, प्रथमेश पोतनीस, योगेश जळवी, सिद्धेश कांदळगावकर, समीर कोचरेकर, ज्योती हरमळलकर, उदय खांडेकर, यांचेसह सविता आश्रमचे विश्वस्त रामचंद्र अडसुळे व किसन चौरे यांची उपस्थिती होती. कै.प्रज्ञेश वानीवडेकर यांच्या स्मृतीला वंदन करताना उपस्थितांनी त्यांच्या कर्तव्य परायणतेचे स्मरण केले. तर सविता आश्रमच्या वतीने बांधवांसाठी मिळालेल्या साहित्याबद्दल समस्त सिंधुदुर्ग पोलीस २०१० बॅचच्या टीमला धन्यवाद देण्यात आले.













