वाभवे-वैभववाडी येथे भरली बांधावरची शाळा
अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी रमले शेतात
वैभववाडी (प्रतिनिधी) : शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे आणि ग्रामीण भागाच्या विकासात शेती मोठी भूमिका बजावते. विद्यार्थ्याना त्यांच्या पालकांना शेतीत मदत करून व्यावहारिक ज्ञान मिळू शकते, असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यावेळी व्यक्त केले. सध्या शाळांमध्ये शेती या विषयास अनुसरून परसबाग व इतर शेतीविषयक उपक्रम राबविले जातात ज्यामुळे मुलांना लहानपणापासूनच शेतीची माहिती मिळते. विद्यार्थ्याच्या मनामध्ये शेतीबाबत आवड निर्माण व्हावी, शेतीची प्रथमिक माहिती मिळावी, या हेतूने वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल यांच्या वतीने ‘एक दिवस बळीराजासाठी’ अर्थात ‘बांधावरची शेती’ हा उपक्रम राबविण्यात आला.

वाभवे येथील शेतकरी शरद तांबे यांच्या शेतीत विद्यार्थ्यांनी बांधावरची शेती अनुभवली. नांगरणी कशी केली जाते, भात लावणी कशी करतात, पावर टिलरचा वापर, खत कोणतं वापरतात, श्री पद्धतीने लावणी कशी केली जाते, तरवा काढणे, भात लावणे, चिखल करणे याबाबत माहिती व प्रत्यक्ष अनुभव घेत शेतीच्या विविध कामांचा आनंद विद्यार्थ्यांनी या प्रसंगी लुटला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, वर्गशिक्षक एम.एस. चोरगे, एस.टी. तुळसणकर, एस.ए. सबनिस तसेच शेतकरी शरद तांबे व तन्वी तांबे तसेच प्रसाद तांबे, अक्षय तांबे, अंकित तांबे तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.












