नितेश राणेंची पुढाकाराने सुरुवात; SSG2025 ॲपद्वारे ऑनलाईन प्रतिसादाचे आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणसाठी नागरिकांचा प्रतिसाद ठरणार निर्णायक !

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत SSG 2025 या ॲपच्या माध्यमातुन स्व:ता ऑनलाईन प्रतिक्रिया नोंदवुन जिल्हावासियांना स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत प्रतिक्रिया नोंदविण्याबाबत आवाहन केले आहे.

2018 पासुन केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरु केली आहे. या सर्वेक्षणातुन ग्रामपंचायत, जिल्हा तसेच राज्यांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे. स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर बांधण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील ग्रामीण भागात अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडुन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नमुना निवड पध्दतीने गावांची निवड करुन, ॲपच्या माध्यमातुन हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्लास्टीक संकलन केंद्र, गोबरधन प्रकल्प, मैला गाळ व्यवस्थापन या प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत एकूण एक हजार गुणांचे गुणांकन पध्दत केले जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन प्रणाली वरील प्रगती 240 गुण, गावातील प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण 540 गुण, जिल्हा व तालुका स्तरावरील प्रकल्प थेट निरीक्षणासाठी 120 गुण, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी 100 गुण असे एकूण एक हजार गुणांच्या आधारे ग्रामपंचायत, जिल्हा, राज्य यांचे मुल्यांकन होणार आहे. केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रणालीवरील उपलब्ध माहितीचे यामध्ये जिल्हा निहाय मुल्यांकन करण्यात येणार आहे. नमुना पध्दतीने निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणाव्दारे मोबाईल ॲपवर माहिती भरली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबांना भेटी देणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे, शाळा, अंणवाडी, ग्रामपंचायत या संस्थात्मक ठिकाणी भेटी देणे, सार्वजनिक शौचालय पाहणी, स्वच्छता संदेश यांची पाहणी, तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांची माहिती घेवून फोटो जिओ टँग केले जाणार आहेत.

यासाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 हे ॲप जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. तसेच

https://play.google.com/store/apps/details?id=com.ssg.abc.ssg&pcampaignid=web_share

या लिंकचा वापर करुन हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 अंतर्गत नागरिकांचा प्रतिसाद याकरीता 100 गुण देण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2022 मध्ये आपल्या जिल्ह्याला पश्चिम भारतात दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता. हा आलेख चढता राहण्याकरीता जिल्हा वासियांनी गुगल प्ले स्टोअर वरुन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 SSG2025 हे ॲप डाऊनलोड करुन प्रतिक्रिया नोदविणे गरजेचे आहे. यासाठी पालकमंत्री नितेश राणे स्वतः ऍप द्वारे ऑनलाईन नोंदणी केली आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ऍप डाऊनलोड करून जास्तीतजास्त नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे जिल्हावासियांना जाहिर केले आहे.

error: Content is protected !!