ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात व त्यातून जाणारे बळी व जखमींची संख्या वाढत आहे. याबाबत खासदार नारायण राणे यांनी गंभीर दखल घेतली. त्या ठेकेदाराला तातडीने नोटीस काढा! व खड्डे भरून सुस्थितीत मार्ग करा असे आदेश त्यांनी महामार्ग संदर्भात आयोजित बैठकीत दिले.
मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडले असून वाहनांना अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर पाणी साचत आहे व खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे महामार्ग धोकादायक बनला आहे. या संदर्भात ही महत्त्वाची बैठक खासदार नारायण राणे यांनी घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग प्राधिकरण या विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव सण जवळ आला आहे. महामार्ग व त्यावरील खड्डे तातडीने कसे भरता येतील व महामार्ग सुस्थितीत ठेवता येईल याचे नियोजन करावे. जो ठेकेदार याला जबाबदार आहे त्याला नोटीस काढा. निकृष्ट दर्जाचे हे काम झाले असून त्याबाबत ठेकेदाराला जबाबदार धरा, असे आदेश खासदार नारायण राणे यांनी या बैठकीत दिले.












