वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनही विद्या मंदिर आचिर्णे कडुवाडी प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. असा आरोप करीत संतप्त पालकांनी गटशिक्षणाधिकारी श्री वडर यांना घेराव घातला. जोपर्यंत शाळेच्या इमारतीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आणून बसवणार असा आक्रमक पवित्रा पालकांनी घेतला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दूरध्वनीवरून दिलेल्या आश्वासनानंतर पालकांनी आंदोलन मागे घेतले.
विद्या मंदिर आचिर्णे कडूवाडी शाळेचे इमारतीची दुरावस्था झाली आहे. याबाबत दोन वर्षे ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. 17 जानेवारी 2025 रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी याबाबत निवेदन दिले होते. यावेळी दुरुस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र सहा सात महिन्यात यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गेली दोन वर्ष येथील विद्यार्थ्यांना समाज मंदिरात बसण्याची वेळ आली आहे. सातत्याने पाठपुरावा करूनही शाळेची इमारत दुरुस्त होत नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी पालकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शाळेच्या इमारतीची दुरुस्ती झाली नाही तर विद्यार्थ्यांना पंचायत समिती कार्यालयात आणून बसवू. असा इशारा दिला. यावेळी उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके व माजी सभापती लक्ष्मण रावराणे उपस्थित होते. यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर व शिक्षणाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावर खेबुडकर यांनी या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव अंदाजपत्रक ताबडतोब तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला दिले आहेत.त्यानुसार तातडीने बांधकामचे अधिकारी अंदाजपत्रक तयार करण्यासाठी शाळेकडे रवाना झाले. तसेच लवकरच शिक्षणाधिकारी या शाळेला भेट देऊन पाहणी करतील असेही आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार गटशिक्षणाधिकारी वैभववाडी यांनी शाळा दुरुस्ती बाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी श्रीधर कडू, विश्वंभर कडू,मनोहर कडू, अंकुश कडू,मंगेश कडू,प्रकाश कडू, शंकर कडू, राजाराम साळस्कर,मोहन कडू,ज्ञानदेव कडू,सुहास कडू,केतन कडू,संतोष कडू,श्रद्धा कडू सदिच्छाकडून स्वाध्यांकडून यांच्यासह ग्रामस्थ पालक उपस्थित होते.












