वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगाराचा आकस्मित मृत्यू झाला आहे.अंकुल रामसिंह (23, मूळ रा. अकोंधा ता. चांदपूर जि. विजनोर, उत्तर प्रदेश, सध्या रा. कोकिसरे नारकरवाडी ) असे मृत कामगाराचे नाव आहे. याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अंकुल हा सकाळी आंघोळीला बाथरूम मध्ये गेला होता. मात्र बराच वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या सोबत असलेला त्याचा सहकारी कामगार महेंद्र धर्मपाल सिंह याने बाथरूम मध्ये पाहिलं असता तो बेशुद्धवस्थेत दिसून आला.
त्याला बाथरूम मधून बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता.या घटनेची माहिती त्याचा सहकारी कामगार महेंद्र सिंह याने पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा करीत आहेत.










