कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमीक शाळा तुळसुली चव्हाटा शाळेने श्री पद्धती भातशेतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. भाताची श्री पद्धत आणि पारंपारिक पद्धतीची तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी दोन पद्धतीने लागवड करून कमी खर्च श्रम आणि जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याची खात्री करण्यासाठी हा प्रयोग केल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे काढणी, लावणी, कोळपणी पासून ते कापणी मळणी पर्यंत हे सर्व विद्यार्थी, पालक शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक यांच्या मदतीनेच होणार असल्याचे मुख्याध्यापक श्री.हरिश्चंद्र कालेलकर यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये शेती विषयी आवड, मेहनतीची सवय आणि श्रमिकांबद्दल या मुख्य उद्देशाने तसेच ओसाड पडत असलेली जमीन आणि लोकांची शेती बाबतची नकारात्मकता दूर करण्यासाठीच हा प्रयोग केल्याचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षअस्मिता इब्रामपूरकर यांनी सांगितले. यासाठी कृषी पदविका प्राप्त असलेल्या पालक गौतमी गुरुदास सावंत यांचे मार्गदर्शन मिळाले. यामध्ये पुढाकार घेऊन आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य करणारे सचिन इब्रामपूरकर आणि अमित इब्रामपूरकर यांचे सर्व पालकांनी आभार मानले. एक दिवस बांधावरची शाळा या उपक्रमात शेती विषयी म्हणावं तेवढी माहिती मिळत नसल्याने संपूर्ण हंगामात रोपांची वाढ प्रगती त्यासाठी करावे लागणारे नियोजन मेहनत याची संपूर्ण कल्पना येण्यासाठी या शाळेने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सगळीकडे चर्चा होत आहे.
कोकणातील अनुकूल वातावरण आणि सहज उपलब्ध होणारी जमीन याचा उपयोग करून घेण्यासाठी भविष्यात नाचणी, वरी आणि बासमती भाताची लागवड श्री पद्धतीने करण्याचा मानस शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केला. यावेळी शाळेचे उपशिक्षक दिलीप मसके आणि मुख्याध्यापक हरिश्चंद्र कालेलकर यांचा उत्साह पाहून सर्व पालकांनी स्वयंप्रेरणेने उत्स्फूर्त सहभाग घेतला. एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा उपक्रम नक्कीच जिल्ह्यातील इतर शाळांना पालकांना प्रेरणादायी ठरेल.












