देवगड-जामसंडेचा पाणीप्रश्न मार्गी लागणार; दहिबांव नळयोजना दुरुस्तीच्या कामास प्रारंभ

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

देवगड (प्रतिनिधी) : दहिबांव नळयोजनेच्या पाईपलाईन दुरूस्तीचा कामामुळे भविष्यात देवगड जामसंडेचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. या कामामुळे पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला नाही तरी जाणवणाऱ्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील. देवगड जामसंडेवासियांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठी योजना राबवावी लागेल. त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी दिली.

देवगड जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबांव नळपाणी योजनेच्या पाईप लाईन दुरूस्ती कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ९ कोटी २१ लाख रूपये मंजुर झाले. या कामाचा शुभारंभ जामसंडे वेळवाडी सडा येथील बांधण्यात आलेल्या ६.५ लक्ष लिटर क्षमतेच्या साठवण टाकी येथे मंगळवारी सायंकाळी ना.नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साठवण टाकीचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे, बाळा खडपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, प्रियांका साळसकर, संतोष किंजवडेकर, प्रकाश राणे, गटनेते शरद ठुकरूल, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, आद्या गुमास्ते, रूचाली पाटकर, स्वरा कावले, एकनाथ तेली, तन्वी शिंदे, उल्हास मणचेकर, ज्ञानेश्वर खवळे, वैभव करंगुटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कामामुळे देवगड जामसंडेवासियांना वारंवार भेडसावणाऱ्या नळयोजना दुरूस्तीचा प्रश्न सुटून पाणीपुरवठा सुरळीत राहील. या कामासाठी ९ कोटी २१ लाख रूपये निधी मंजुर करून देण्यात मोठा वाटा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असून त्यांना फोन केल्यानंतर तात्काळ फाईलवर सही करून निधी मंजुर करून दिला यामुळे आपण त्यांचे आभार मानतो, असे राणे यांनी सांगीतले. दुरूस्तीचा कामामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. हे काम वेळेवर व चांगल्या दर्जाचे होईल यात शंका नाही मात्र कामाच्या गुणवत्तेसाठी नगराध्यक्षा व सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे. या कामामुळे पुढील सहा ते आठ महिन्यात नागरिक तक्रारी करण्याऐवजी समाधान व्यक्त करतील, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.

महायुतीचे सरकार हे गतीमान सरकार असून तुमचा आमदार आता मंत्री झाला आहे आणि पालकमंत्री म्हणून काम करीत आहे. त्यामुळे विकासकामांना वेग येण्याचा काळ सुरू झाला आहे. विरोधासाठी विरोध करण्याचे दिवस गेले. सर्वजण एकत्र येवून देवगडचा विकास करूया, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी तर आभार शरद ठुकरूल यांनी मानले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, अजित गोगटे, मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी विचार व्यक्त केले.

error: Content is protected !!