ग्रामीण अन गरीब मुला-मुलींनी याचा उपयोग, योग्य अभ्यास करून घ्यावा – संदीप चौकेकर
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट-माळवाडी-हवेलीनगर येथील, शाळेतील मुला-मुलींना रेनकोट वह्यांचे मोफत वाटप प्राणजीवन सहयोग संस्था, शिरवल, ता. कणकवली यांच्या सौजन्याने करण्यात आले. या संस्थेचे अध्यक्ष, समाजसेवक आणि प्रथीतयश उद्योजक अरुण चौकेकर, शिरवल गावचे माजी सरपंच आणि माळवाडी शाळेचे माजी विद्यार्थी मनोज राणे, संघटक प्रशांत गावडे इत्यादी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांचे स्वागत सहशिक्षिका शितल बागवे यांनी गुलाबपुष्प देऊन केले. पाहुण्यांचे हस्ते अंगणवाडी ते इयत्ता दुसरीच्या मुलांना रेनकोट आणि तिसरी चौथीच्या मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष चौकेकर यांनी या मदतीचा सदुपयोग परिपूर्ण अभ्यास करून शाळेचे नाव मोठे करण्यासाठी सर्वांनी करावा, असे आवाहन केले. अशीच दरवर्षी शालेय मदतीतून येथील गोरगरीब मुलांना लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा शाळा व्यवस्थापन समितीचे उमेश वंजारी यांनी व्यक्त केली. अंगणवाडी सेविका प्राची उरणकर यांनी संस्थेचे अध्यक्ष अरुण चौकेकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अंगणवाडी सेविका मयुरी मेस्त्री यांनी सर्वांचे आभार मानले. मिळालेल्या भेटवस्तूमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.














