सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र, शाखा कोकण या संस्थेमार्फत दिनांक 31 जुलै रोजी काझी शहाबुद्दीन हॉल सावंतवाडी येथे तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पाहुणे म्हणून माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, महिंद्रा अकॅडमीचे संस्थापक महेंद्र पेडणेकर, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र (मुंबई) अध्यक्ष डी. एन. मर्डे तसेच ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशन गोवाचे अध्यक्ष मिलाग्रीस डिकोस्टा, सचिव कमलाकांत शिरोडकर, छावा संघटनेचे सदस्य श्याम सावंत, राष्ट्रीय दृष्टीहीन महाराष्ट्र शाखा कोकण अध्यक्ष बाबुराव गावडे, महासचिव शेखर आळवे, सहसचिव प्रकाश वाघ व संस्थेचे इतर सदस्य उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मंगेश तळवणेकर बोलताना म्हणाले, की सर्व अंध बांधवांना आपण गणपतीसाठी गृहपयोगी वस्तूचे वाटप करणार आहोत तसेच अंध बांधवांची पेन्शन वाढावी म्हणून तुमच्या सोबत राहून प्रयत्न करणार आहोत. आपण तुमच्यासोबत कायम राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी अंध बांधवांना दिले. त्यानंतर गोव्याचे मिलाग्रीस डीकोस्टा यांनी आपण सर्व अंधबांधवांसाठी गोवा येथे सहल आयोजित करून काहीतरी गिफ्ट म्हणून देणार असे सांगत संस्थेसाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डी. एन. मर्डे यांनी कोकण शाखेसाठी ऑफिस सावंतवाडी येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार व जास्तीत जास्त कोकण शाखेच्या अंध बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महेंद्र पेडणेकर यांनी आपण कायम अंधबांधवांच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ कोकण शाखेचे अध्यक्ष बाबुराव गावडे यांनी अंधबांधव कोणत्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

राष्ट्रीय दृष्टिहीन महासंघ महाराष्ट्र, शाखा कोकण ही संस्था अंधांनी अंधांच्या भविष्यासाठी आणि कल्याणासाठी काढलेली संस्था आहे. यामधील सर्व सदस्य हे अंध असून कोकण विभागातील अंध बांधवांना त्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनेचा लाभ त्यांना मिळवून देतात. संस्थेमार्फत अंध बांधवांना शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. तसेच मुलांना शिक्षणासाठी संस्थेच्या इतर शाखांमध्येही पाठवण्यात येते.
कार्यक्रमावेळी संस्थेतर्फे अंध बांधवांच्या मुलांना पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. सर्व पाहुण्यांनी कार्यक्रमास आणि संस्थेस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर महासचिव शेखर आळवे यांनी पाहुण्यांचे व सर्व अंध बांधवांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.













