कणकवलीत ४ ऑगस्टला कर्करोग तपासणीसाठी मोबाईल व्हॅन

नागरिकांना तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन सोमवार ४ ऑगस्टला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल होणार आहे. ही व्हॅन या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत असणार आहे. या व्हॅनमध्ये कर्करोग तपासणीच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग या तपासण्यांचा समावेश आहे.

दोन आठवड्यापेक्षा अधिक काळासाठी तोंड येणे, तोंडामध्ये लाळ किंवा पांढरा चट्टा असणे, तोंड उघडायला त्रास होणे अशी मुख कर्करोगाची लक्षणे आहेत. मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्त्राव होणे ही गर्भाशय मुख कर्करोगाची तर स्तनामध्ये गाठ येणे, स्तनांच्या आकारात बदल होणे, स्तनाग्रामधून पु किंवा रक्तस्त्राव होणे ही स्तन कर्करोगाची लक्षणे आहेत. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणीचा लाभ घ्यावा. तपासणीला येताना रुग्णांनी आधार कार्ड व आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल आणावा, असे आवाहन ओरोस जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी केले आहे.

error: Content is protected !!