खारेपाटण (प्रतिनिधी) : या वर्षी इ. ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन झाल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता. खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये ११ वी वर्गाची पटसंख्या वाढवून देण्यासंदर्भात शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी नुकतीच शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांची भेट घेऊन खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून देण्यासंदर्भात लेखी निवेदन दिले.

खारेपाटण ज्युनियर कॉलेज मध्ये कोल्हापूर, राजापूर, वैभववाडी, कणकवली व देवगड आदि तालुक्यातील ग्रामीण डोंगराळ भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असून त्यांना खारेपाटण हे ठिकाण शिक्षणासाठी सोयीचे ठरत आहे. मात्र या वर्षी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगलें गुण असूनही दूरवरचे कॉलेज निवडावे लागते, इथे ये -जा करणे सोयीचे नाही आणि अधिकचा आर्थिक भार पालकांवर पडल्याने विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घेणे शक्य होत नाही असे एकंदरीत चित्र सध्या दिसून येत आहे. त्यामुळे असे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या करीता खारेपाटण ज्युनिअर कॉलेज ला असलेली ८० ही तुकडीची पटसंख्या वाढवून १२० मिळावी व अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा या करीता प्राचार्य संजय सानप व पालक यांच्या विनंती नुसार शिवसेना तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी तात्काळ दखल घेत पालकमंत्री नितेश राणे व राजापूरचे आमदार किरण भैया सामंत यांच्या कानावर सदर विषय घातला व त्यांच्या मार्गदर्शन नुसार विद्यार्थ्यांना स्थानिक कॉलेज मध्ये प्रवेश मिळावा यासाठी वर्गाची पटसंख्या वाढवावी वा नवीन तुकडीला मान्यता द्यावी अशा स्वरूपाचे निवेदन खा. प. शि. प्र. मंडळाच्या वतीने मंगेश गुरव यांच्या माध्यमातून कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक श्री. चौथे यांना सदर करण्यात आले.
या प्रसंगी कृषी उत्पन्न समितीचे मंगेश ब्रम्हदंडे, संस्थेचे यशवंत रायबागकर उपस्थित होते. तर तसा प्रस्ताव तातडीने सादर करा त्याला मान्यता देऊ असे आश्वासन शिक्षण उपसंचालक श्री. चौथे यांनी यावेळी दिले.
या करीता पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे तसेच आमदार किरण भैया सामंत यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांचे व मंगेश गुरव यांचे आभार संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे व सेक्रेटरी महेश कोळसुलकर यांनी मानले.













