कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसापासून खंडित असल्याने नागरिकांनी आज अचानक रास्ता रोको केला. दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर निघाले असता आपला ताफा थांबवुन संबंधित घटनेची माहिती घेतली असता, संबंधीत गॅस एजन्सी मार्फत गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही, त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही, यात एजन्सी दोषी असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.
याबाबत तात्काळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, तसेच सेल्स मॅनेजर एचपी गॅस एजन्सी यांच्याशी फोनवरून संपर्क केला. गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या, तसेच घटनेची कायदेशीर चौकशी करून सदर एजन्सी जर वितरणास पात्र नसेल, तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी, पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये, अशा सक्त सूचना दिल्या. पुढील अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन कंपनीकडून मिळाल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले आणि गॅस वितरण सुरळीत सुरू झाले.












