महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रकाश कानूरकर यांचा गौरव

चौके ( प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा (ता. मालवण) येथील शिक्षक प्रकाश विठोबा कानूरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५ जाहीर झाला. हा पुरस्कार मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.

प्रकाश कानूरकर यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शिक्षणाबरोबरच सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. व्यसनमुक्ती अभियान, कांदळवन बचाव मोहीम, पक्षी वाचवा अभियान, यांसारख्या उपक्रमांत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तसेच २०० हून अधिक वडाच्या झाडांचे वृक्षारोपण , तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. सलग १८ वर्षे इयत्ता दहावीच्या सेमी वर्गाचा १०० टक्के निकाल, एका वर्षातच १० विद्यार्थी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे आणि गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, अशी कामगिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली आहे. तसेच राज्य व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, व्हिडिओ निर्मिती आणि शिक्षक साहित्य निर्मिती स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी यश मिळवून दिले आहे.

श्री. कानूरकर हे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ (जिल्हा अध्यक्ष), सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ (सचिव), तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० प्रसारक (राज्यस्तरीय वेध परिवार सदस्य व जिल्हा समन्वयक) या पदांवर कार्यरत आहेत.

यापूर्वी त्यांना युवा गौरव पुरस्कार (२००१), ज्ञानदीप आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२३), नॅशनल एज्यूकेशनल एक्सेलन्स अवॉर्ड (२०२३), राष्ट्रीय आदर्श शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार (२०२२) आणि शिक्षणव्रती पुरस्कार (२०२४) अशा मानाच्या सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.

या पुरस्काराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढला असून, शिक्षक म्हणून प्रकाश कानूरकर यांचे शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणीय कार्य राज्य पातळीवर अधोरेखित झाले आहे. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय. कट्टा च्या शतकमहोत्सवी वर्षात प्रथमच एका शिक्षकांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याने संस्थेसाठी अभिमानास्पद असा हा सन्मान आहे. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे व सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी सरांचे कौतुक केले.

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त ॲड. एस. एस. पवार, कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, उपाध्यक्ष तथा सरपंच शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई, सहसचिव एस. डी. गावडे, खजिनदार रवींद्र पावसकर, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर व सर्व संचालक मंडळ सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य आणि माता पालक संघ सदस्य यांनी या गौरवमुर्तीचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!