नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची विद्यार्थ्यांना अनोखी संधी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे फोंडाघाट येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रास अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन पद्धती आणि नव्या प्रयोगांची माहिती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे देणे हा या शैक्षणिक उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र म्हणून ओळखले जाणारे फोंडाघाट कृषी संशोधन केंद्र हे विद्यापीठाचा बेस्ट रिसर्च सेंटर अवॉर्ड प्राप्त संस्थांपैकी एक आहे. विविध कृषी प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण विकास आणि शेतीसंबंधित नवकल्पना यामुळे हे केंद्र विशेष प्रतिष्ठा मिळवलेले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेती संशोधनाची ओळख करून देण्यासाठी ही अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. अभ्यासभेटीच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालाजी सुरवसे यांनी शेती व शेतीपूरक व्यवसायाचे अर्थकारण, रोजगारनिर्मितीचे नवीन मार्ग आणि कृषी क्षेत्रातील वाढत्या संधी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राकडे प्रेरित केले.फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. विजयकुमार शेटये यांनी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना प्रदान केली. भातशेतीतील समस्या, त्यावर उपाययोजना, उत्पादनवाढीचे मार्ग, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी सखोल चर्चा केली.
विशेषत: नव्याने विकसित करण्यात आलेल्या मल्चिंग टेक्नॉलॉजीविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. पाणी उपलब्ध असलेल्या, शेतीला कुंपण असलेल्या आणि बाहेरगावी राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.
मे महिन्यात मल्चिंग पद्धतीने भाताचे बी लावल्यास त्याच वर्षात दोन अतिरिक्त पिके घेता येतात आणि एका मल्चिंगवर सहा पिकांचे उत्पादन घेण्याची क्षमता असल्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक आर्थिकदृष्ट्या लाभदायक होते, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. शेटये यांनी अत्यंत समाधानकारक उत्तरे दिली.या अभ्यासभेटीमुळे विद्यार्थ्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष नवीन शेती तंत्रज्ञानाचे मोलाचे आकलन झाले.फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी अर्थशास्त्र विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना अशा शैक्षणिक अनुभवातून भविष्यात संशोधनाची दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. अर्थशास्त्र विभागाची ही अभ्यासभेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि संशोधनाभिमुख ठरली….











