कुष्ठरोग राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० ऑक्टोबर २०२५ रोजी असाधारण राजपत्र जारी करून कुष्ठरोग या आजाराला राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. साथरोग अधिनियम, १८९७ नुसार हा निर्णय सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली आहे.

​​कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून, जर त्याचे लवकर निदान झाले नाही आणि उपचार केले नाहीतर शारीरिक व्यंग, विकलांगता व लक्षणीय आजार होऊ शकतात. त्यामुळे वेळीच प्रतिबंध आणि प्रभावी रोग व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी कुष्ठरोग या आजाराला राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केले आहे. यासाठी काही तरतुदी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. या सर्व अधिसूचना शासकीय, खाजगी, अशासकीय संस्था, खाजगी आरोग्य सेवा पुरवठादार, तसेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांसह वैद्यकीय संस्था इत्यादी सर्व क्षेत्रांना लागू करण्यात आले आहेत, असेही डॉ धुरी यांनी सांगितले.

​कुष्ठरोग या आजाराला राज्यात ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित केल्यानंतर कुष्ठरोगाचे निदान झालेल्या सर्व रुग्णांचे अहवाल, निदान झाल्यानंतर अनिवार्यपणे दोन आठवड्यांच्या आत सादर करणे आवश्यक करण्यात आले आहे. अहवाल सहायक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग), जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक, संबंधित जिल्ह्याचे नगरपालिका, महानगर आरोग्य अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील डॉक्टर, विकृतिशास्त्रज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अहवाल देणे बंधनकारक आहे.

error: Content is protected !!