स्व. बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत फोंडाघाट स्थानकाचे मूल्यांकन संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन एस.टी.विभागातर्फे, संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ – सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत, नुकतेच पर्यटन जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील विकसनशील गाव – फोंडाघाटची पाहणी, मूल्यांकन समितीने नुकतीच केली. जागरूक नागरिक, एनजीओ सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय स्थानिक नेते, ग्रामस्थ रिक्षा चालक पत्रकार यांचे कडून स्वच्छता प्रश्नावली लिहून घेत मूल्यांकन व वस्तुस्थितीची पाहणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. स्थानक परिसर, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा यासह चर्चा करून माहिती घेतली. आणि स्थानकाचा ऐतिहासिक वारसा ऐकून समाधान व्यक्त केले.
या मूल्यमापन समितीमध्ये, सुनील भोकरे (विभाग नियंत्रक, सांगली) प्रवीण पाटील (विभा.कामगार अधिकारी) आणि दिलीप जाधव- वरिष्ठ लिपिक, कृष्णा मुळदेकर- वाहतूक नियंत्रक इत्यादी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य मामा हळदीवे, सर्पमित्र तथा प्रवासी संघटना सदस्य संजय नेरुळकर व श्रीनिवास नाडकर्णी- पत्रकार, संजय चव्हाण- आरोग्य दूत, अजित पाटील- रिक्षा संघटना,नाना रेवडेकर- सहा सीटर संघटना, आणि प्रवासी उपस्थित होते.
फोंडाघाट स्थानक प्रमुख दयानंद भोगटे यांनी मूल्यमापन समितीचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. वाहतूक नियंत्रक गंपू राठोड, आणि संजय पवार यांच्या सतर्क सहकार्याचेही यावेळी कौतुक करण्यात आले. गावातील एनजीओ, ग्रामस्थ, विविध संघटना, संस्था, शाळा- महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकवर्ग स्टॅन्ड वरील विविध उपक्रमांतर्गत, स्वच्छता अभियान राबवून नेहमीच सहकार्य करतात. मात्र यावेळी एसटी प्रशासनाचे सहकार्य अत्यल्प मिळते अशी प्रतिक्रिया उपस्थितानी व्यक्त केली. शेवटी मूल्यमापन कार्य पूर्ण झाल्या नंतर पत्रकार श्रीनिवास नाडकर्णी यांनी समितीचे आभार मानले.











