अवयवदान व देहदानाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे – डॉ. विद्याधर तायशेटे

राज्यस्तरीय ‘महादान महाचषक’ निबंध स्पर्धेत संगिता पाटील यांचे यश

दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये देहदान, अवयवदान बाबत जनजागृती व्हावी. समाजात असलेले गैरसमज दूर व्हावेत. भारताच्या भावी पिढी मध्ये अवयवदान, देहदानाची मोठी चळवळ उभी रहावी म्हणून शालेय जीवनात त्यांच्यावर महादान विषयक संस्कार शिक्षकांच्या मदतीने घडून येऊ शकतात हे ओळखून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेतर्फे महाराष्ट्र व गोवा द्वीराज्यस्तरीय शालेय व महाविद्यालयीन शिक्षकवर्गासाठी दोन गटात राज्यस्तरीय महादान “महाचषक” निबंध स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन जुलै २०२५ मध्ये करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महादान ही काळाची गरज, विद्यार्थ्यांमध्ये महादान संस्कार रुजवण्यासाठी माझ्या संकल्पना, महादानासाठी शिक्षकांची भूमिका व समाजासाठी महादान – सामूहिक जबाबदारी हे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी या प्रशालेच्या शिक्षिका संगिता पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या पार्श्वभूमीवर दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई व रोटरी क्लब ऑफ वैभववाडी या संस्थांच्या वतीने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रशांत पागनीस यांनी भारतात देहदान व अवयवदान का गरजेचे आहे. अवयवदानाच्या अभावामुळे भारतातील मृत्यू होणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अवयवदान व देहदानाबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे डॉ.विद्याधर तायशेटे यांनी सांगितले. अवयवदानाने अनेकांच्या जीवनाला नवसंजीवनी मिळू शकते असे मत वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक भास्कर नादकर यांनी केले. अवयवदानाचे महत्व व गरज याविषयी माहिती विद्यार्थ्यांना मिळावी म्हणून दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या वतीने प्रशालेच्या ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली.

या कार्यक्रम प्रसंगी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी दि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन, मुंबई या राष्ट्रीय संस्थेचे पदाधिकारी प्रशांत पागनीस, डॉ. विद्याधर तायशेटे, वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे सचिन रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी. एस. नादकर, सर्व प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!