आयुष्यात खुप मोठे व्हा, पण ज्या शाळेत शिकलात त्या शाळेला विसरू नका – शिवराम प्रभु

स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालय व श्री शिवाजी विद्यामंदिर सभागृह, काळसे या नूतन वास्तूंचा उद्घाटन सोहळा संपन्न

चौके (प्रतिनिधी) : “या वास्तूंच्या पूर्ततेसाठी सर्वांनी कठोर मेहनत घेतली आहे. आम्ही शालेय जीवनात शिकताना ज्या समस्यांना सामोरे गेलो त्या समस्या आत्ताच्या विद्यार्थ्यांना जाणवू नयेत यासाठी सर्व मान्यवर मेहनत घेत आहेत. माझ्या स्वर्गीय आईच्या नावाने आपल्या गावात कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले ही माझ्यासाठी व आम्हां कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही आयुष्यात खुप प्रगती करा, खुप मोठे व्हा पण ज्या शाळेत तुम्ही शिकलात, ज्या मातीत तुम्ही घडलात त्या शाळेला, त्या मातीला कधीही विसरू नका. तुम्हीही मोठे झाल्यावर भविष्यात शाळेला मदत करा. आपण आपल्या शाळेचे, समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात जागृत राहिली पाहिजे.” असे प्रतिपादन श्री देव रवळनाथ श्री देव लिंगेश्वर देवालय ट्रस्ट, मुंबईचे अध्यक्ष, शिवराम वामन प्रभु यांनी काळसे हायस्कूल येथे उद्घाटन प्रसंगी केले.

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. सौ. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य (कनिष्ठ) महाविद्यालयाची नूतन वास्तू तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार सुनील प्रभु यांच्या प्रयत्नाने राज्यसभा खासदार अनिल देसाई व प्रियांका चतुर्वेदी यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलेले श्री शिवाजी विद्यामंदिर सभागृह या दोन्ही नूतन वास्तू तसेच अद्ययावत माहिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा (आय टी लॅब) यांचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व श्री देव रवळनाथ, श्री देव लिंगेश्वर देवालय ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष शिवराम वामन प्रभु यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक आणि काळसे धामापूर गावचे ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना शिवराम वामन प्रभु यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी, प्रमुख अतिथी शिवराम वामन प्रभु, संस्थेचे उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, संस्थेचे माजी अध्यक्ष सीए हेमंत परब, संचालक शरद गोसावी, सिताराम (दाजी) परब, डाॅ. शरदचंद्र काळसेकर, उमेश प्रभू, शिवनंदन प्रभु, माजी विद्यार्थी सेवा संस्थेचे सह सचिव पंढरीनाथ प्रभू, माजी सचिव व सल्लागार केशव सावंत, माजी सह सचिव व सल्लागार गजानन प्रभू, जेष्ठ मार्गदर्शक अशोक प्रभू, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, मुख्याध्यापक अविनाश परब, धामापूर माजी सरपंच पार्वती धामापूरकर, माजी संचालक सुवर्ण काळसेकर, माजी मुख्याध्यापक तुकाराम पेडणेकर, ठेकेदार कमलेश वंजारी, ग्रामपंचायत सदस्य मोनिका म्हापणकर, राजू परब, वेदांत प्रभू, माजी विद्यार्थी सौरभ गोगटे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख अतिथी शिवराम वामन प्रभु यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि शिवछत्रपतींची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या जडणघडणीत आणि कनिष्ठ महाविद्यालय व सभागृह या वास्तूंच्या नूतनीकरण कामासाठी ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले असे संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक, आजी-माजी संचालक, ठेकेदार, वास्तु विशारद यांचा ही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना, संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी असे प्रतिपादन केले की, संस्थेला आज ६५ वर्षे झाली आणि या कालावधीत अनेक अध्यक्ष होऊन गेले. त्यापैकी, संस्थेचे माजी अध्यक्ष विजय वसंत प्रभू आणि अर्चना प्रभू यांनी अध्यक्ष म्हणून प्रदीर्घकाळ केलेले कार्य हे उल्लेखनीय असेच आहे. तसेच प्रशालेच्या स्थापनेपासून संस्थापक मुख्याध्यापक म्हणून बी. डी. एमकनमर्डे व त्यांनतर भागवत, परूळेकर, व्ही. डी., पेडणेकर असे अनेक मुख्याध्यापक लाभले व त्यांनीही त्या त्या काळात खुप चांगली कामे करून शाळेचा नावलौकिक वाढविला. त्यांचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. तसेच शाळेसाठी ज्या घाडी कुटुंबियांनी जमिनी दिल्यात त्यांचेेही यावेळी आभार मानले. शिवराम वामन प्रभु आणि आमदार सुनील वामन प्रभु यांनी त्यांचे या गावांवरील प्रेम आणि कर्तव्यभावनेतून आपल्या गावासाठी आणि शाळेसाठी अमूल्य असे हे योगदान दिलेले आहे. श्री शिवाजी विद्यामंदिर सभागृह हे आता केवळ सभागृह नसून एक बहुउद्देशीय असा हाॅल (मल्टीपरपज हाॅल) आहे. काळसे धामापूर गावातील ग्रामस्थांसाठी लग्न समारंभ, मेळावे, शिबिरे, सभा घेण्यासाठी हा हाॅल उपलब्ध झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयी बरोबरच ग्रामस्थांनाही या हाॅलची सुविधा उपलब्ध झालेली आहे. कनिष्ठ महाविद्यालय इमारतीचे बांधकाम ठेकेदार योगेश राऊळ व सभागृहाचे बांधकाम ठेकेदार कमलेश वंजारी यांनीही या दोन्ही वास्तूंचे काम उत्कृष्ठरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

संस्थेच्या या दोन्ही वास्तू उभ्या राहण्यासाठी माजी अध्यक्ष सीए हेमंत परब, माजी सह सचिव, गजानन प्रभू, उपाध्यक्ष योगेश राऊळ, माजी सचिव केशव सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा करून बांधकाम पूर्ण करून घेतलेले आहे. अशाप्रकारे सर्वांच्या योगदानातून सुंदर अशा वास्तूंचे निर्माण या ठिकाणी झालेले आहे. विशेष करून इयत्ता १० वी सलग १३ वर्षे व १२ वी सलग ९ वर्षे आपल्या काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी हे १००% निकालाची परंपरा कायम राखत आहेत. त्यामुळे सोयीसुविधां बरोबरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीही झालेली दिसून येत आहे. यामध्ये शिक्षकांचेही योगदान महत्त्वपूर्ण आहे. गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी घडवण्यात शाळेचा नावलौकिक वाढत आहे. यासाठी सर्व संस्थाचालक हे परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून अभ्यासामध्ये कठोर मेहनत घ्यावी आणि स्वतःचा उत्कर्ष साध्य करावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष सीए हेमंत परब यांनी असे प्रतिपादन केले की, आजचा दिवस हा संस्थेच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये आयटी लॅब, शाळा सभागृह यांचे बांधकामासाठी आमदार सुनील प्रभु साहेबांनी त्यांच्या प्रयत्नातून खासदार निधी तसेच सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच शाळेच्या संरक्षक भिंती साठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला तसेच काही दात्यांनी शाळेच्या फ्लोअरिंगसाठी निधी दिला. त्यामुळे प्रशालेच्या इन्फ्रास्ट्रक्चरल कामांना गती मिळाली आणि प्रशालेचे रूपही आता बदलून गेले आहे. अशाप्रकारे, काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इमारतींची केवळ उंची वाढली नाही तर शैक्षणिक पात्रताही वाढलेली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक शंकर काळसेकर यांनी केले व आभार माजी सचिव व सल्लागार केशव सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!